Join us

वर्सोवा जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 3, 2025 19:00 IST

वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर ही परिणाम झाला आहे.

मुंबई-वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर ही परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे येथील वर्सोवा जेट्टीची मोठ्याप्रमाणात दुरावस्था तर झालीच आहे, त्याचबरोबर याठिकाणी अनेक गैरसोई असल्याने येथील वर्सोवा जेट्टीच्या मजबूतीकर, आधुनिकीकरण व मच्छीमारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली. लोकमतला याबद्धल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

केंद्र सरकारने हे विशेष आर्थिक पॅकेज लवकर जाहीर न केल्यास येथील मच्छीमार मोठ्या संकटात सापडतील, असे स्पष्ट करत खासदार वायकर यांनी केंद्र सरकारने या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देऊन येथील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या लोकसभा क्षेत्रामध्ये वर्सोवा जेट्टीचा समावेश होतो. येथील कोळी बांधवांचा मासेमारीवरच उदरनिर्वाह चालतो. परंतु येथे अनेक असुविधा असल्याने त्यांचे जीवन व रोजगार दोन्ही संकटात सापडेल आहे. येथील वर्सोवा जेट्टीच्या दुरावस्थेत दिवसेन दिवस वाढ होत आहे. येथील मच्छीमारांसाठी ही जेट्टी खूपच महत्वाची आहे. त्यामुळे या जेट्टीचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्याप्रमाणात निधीची गरज आहे. यासाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. या पॅकेजमध्ये आधुनिक सोई सुविधांनी युक्त जेट्टीची निर्मिती, कोल्ड स्टोरेज, स्वच्छता, बोटींची सुरक्षितता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, बोटी या खाडीच्या किनाऱ्यावर पार्क करण्याची व्यवस्था, नादुरुस्त बोटी दुरुस्त करण्यासाठी जागेची सुविधा आधींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

वर्सोवा क्षेत्रात सिवरेज ट्रीटमेंट प्लांट व ड्रेनेज सुविधा नसल्याने याठिकाणी घाणेरडे पाणी थेट या खाडीत सोडण्यात येते. यामुळे ही खाडी प्रदूषित झाली आहे. यामुळे या खाडीतील जलचर प्राणी यांच्या जीवालाधोका निर्माण झाला आहे. ही संमस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने या दोन्ही गोष्टीची पूर्तता करण्यासाठी विशेष उपाय योजना करणे आवश्यक आहे, असे मत ही खासदार वायकर यांनी मांडले. 

या खाडीमध्ये व आसपास मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या आहे. यामुळे येथील रहिवाश्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील रहिवाश्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. येथील पाण्याच्या पाईपलाईन खूपच जुन्या व नादुरुस्त झाल्या आहेत. या ठिकाणी सरकारने नवीन पाण्याची लाईन टाकल्यास येथील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार असल्याचे खासदार वायकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणेल.