शाळा सुरू होण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? पालक म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:00 AM2024-01-02T10:00:24+5:302024-01-02T10:03:26+5:30
मुलांची झोप पुरेशी व्हावी म्हणून राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली.
मुंबई : मुलांची झोप पुरेशी व्हावी म्हणून राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली. शाळांच्या सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांचे आपापले फायदे-तोटे आहेत. मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांनी मरगळलेपणाने, उपाशी पोटाने नव्हे, तर ताजेतवाने राहून शाळेत यावे, शिवाय संध्याकाळी त्यांना खेळायला आणि अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, यासाठी सुवर्ण मध्य शोधावा लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर या निर्णयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याबरोबर मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात या संदर्भात निर्णय होऊन लहानग्यांच्या शाळांची वेळ बदलण्याची शक्यता आहे.
शाळेच्या वेळा या मुलांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊनच असायला हव्यात, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुले रात्री उशिरापर्यंत जागतात.
मुख्याध्यापकांचे म्हणणे काय?
झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा बदलण्याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. टीव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे.
आई-वडील नोकरी करणारे असल्याने अशावेळी स्वाभाविकपणेच सर्व कुटुंबाला झोपायला उशीर होतो.
खेड्यापाड्यातसुद्धा रात्री ११ नंतर झोपणे स्वाभाविक मानले जाते. अशा वेळी मुलांचे सकाळचे शाळेतील दोन-तीन तास झोपेतच जातात.
शिकण्याकडे त्यांचे लक्ष नसते, शिकवलेले त्यांना कळत नाही, असे शिक्षकांचे मत आहे. सारासार विचार करता मुलांच्या शाळांच्या वेळाबद्दल विचार व्हायला हवा, असे मत मुख्याध्यापक व्यक्त करतात.
पालकांकडून स्वागत :
मुलांची झोप त्यांच्या शिकण्यात, लक्षात राहण्याबाबत आणि मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालक म्हणून आपण मुलांना चांगले शिक्षण मिळण्याबाबत आग्रही असले पाहिजे. त्याचवेळी त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी मुलांची झोप हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शाळा उशिरा घेण्याच्या निर्णयाचे स्वागतच हाेईल.- प्रीतीश कैतके, पालक
मुलांना पहाटेच उठावे लागते. पूर्ण झोप न झाल्याने, त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. अशावेळी सकाळी सातच्या भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणे शक्य आहे. ही वेळ बदलण्यासाठी दोन्ही सत्रांच्या शाळांच्या वेळापत्रकात थोडा बदल करावे लागेल. सकाळी नऊची वेळ योग्य ठरू शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.