मुख्यमंत्री वरळीपर्यंत आले, परंतु दुःखी नाखवा कुटुंबीयांचे सात्वन केले नाही, कोळी समाजात रोष
By मनोहर कुंभेजकर | Published: July 12, 2024 06:49 PM2024-07-12T18:49:01+5:302024-07-12T19:22:29+5:30
Mumbai: वरळी हिट ॲंड रन प्रकरणात बळी गेलेल्या कोळी विक्रेती महिला स्वर्गीय कावेरी प्रदीप नाखवा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी व कुटूंबांचे सात्वन करण्यासाठी त्यांच्या घरी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्या वरळी कोळीवाड्यातील घरी भेट दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - वरळी हिट ॲंड रन प्रकरणात बळी गेलेल्या कोळी विक्रेती महिला स्वर्गीय कावेरी प्रदीप नाखवा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी व कुटूंबांचे सात्वन करण्यासाठी त्यांच्या घरी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्या वरळी कोळीवाड्यातील घरी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि,10 जुलै रोजी वरळी पर्यंत कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्याची पाहणी करण्यासाठी येथे आले होते,मात्र दुःखी नाखवा कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते आले नसल्याबद्धल कोळी समाजात निर्माण झाला आहे अशी माहिती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.
आपल्या बरोबर महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती भक्कम पणे पाठीशी उभी राहील,वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी शोकाकूल नाखवा कुटुंबाला यावेळी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, मुंबई महिला संघटक उज्वला पाटील, पालघर जिल्हा अध्यक्ष मानवेंद्र आरेकर, उपाध्यक्ष विजय थाटू, मरोल महिला मासे वि. सं. अध्यक्षा राजेश्री भानजी, अनिता पाटील, मंदा कोळी, दर्यावर्दी महिला मंडळ सचिव छाया पाटील, सदस्य भूषण निजाई तसेच कोळी महिला उस्थित होत्या व वरळी गावातून बाळू नाखवा, हेमंत वसंत नाखवा, हरिश्चंद्र नाखवा उपस्थित होते.
यावेळी दिवंगत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा मुलगा व मुलगी यांनी ढांसाढासा रडून आपल्या भावना व्यक्त केल्या.पावसाळी मासेमारी बंद काळात दोन महिने उदरनिर्वहा साठी छत्रपती शिवाजी महाराज मंडई (काॅफ्रट मार्केट) येथून होलसेल मध्ये मासळी खरेदी करुन गांवात किरकोळ विक्री माझी बायको करित होती. मी मासळी आणण्यासाठी मदत करत होतो. घटनेच्या दिवशी आम्ही सी.जी. हाऊस पर्यंत ३५ च्या वेगाने स्कुटर वरून येत असताना मागून आम्हाला वेगात असलेल्या मिहीर शाह यांच्या कारने ठोकले, व आम्ही गाडीच्या बोनेटवर पडून बायको टायर खाली गेली, मी बोनेटवर जोरजोरात मारुन गाडी थांबविण्याची याचना करत होतो. परंतू मिहीर शाह यांनी थांबता फरफरट सी लिंक पर्यंत नेऊन टायर मधून काढून पुन्हा तिच्या अंगावरून गाडी घातली. त्यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
मिहीर शहाचे वडिल सह आरोपी असताना त्यांना जामिन मंजूर झाला कसा? याबाबत देखील संशय आहे. प्रदिप नाखवा यांनी आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा व्हावी अशा वेदना व्यक्त केल्या.शेवटी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून स्वर्गिय कावेरी नाखवा यांना समितीने श्रध्दांजली अर्पण केली.
त्यानंतर समितीने वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्रा काटकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपी मिहीर शाह व सह आरोपी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच खटला जलद न्यायालयात चालवावा अशी मागणी केली. जरा देखील आरोपींना मदत करण्याच्या कोणी प्रयत्न केला,तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे किरण कोळी यांनी स्पष्ट केले.