मुंबई - राजधानी मुंबईसह राज्यभरात भावपूर्ण आणि तितक्याच जल्लोषात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बाप्पांच्या उंचच-उंच मूर्तींसह मोठ्या मिरवणुकाही पाहायला मिळाल्या. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाही उत्साहपूर्ण सहभाग असल्याचे दिसून आले. तर, दुसरीकडे प्रशासनानेही विसर्जन मिरवणुकीत आणि विसर्जनस्थळी नागरिकांची सोय केल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक व विसर्जनस्थळांची पाहणी करत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त ठाणे शहरातील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या मंडपाना भेटी देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने गणेशभक्ताना वडापावचे वाटप केले. सर्वसामान्य गणेशभक्तांच्या देखील भेटीगाठी घेतल्या.
दरम्यान, ठाण्यातील मासुंदा तलाव येथील सोयी सुविधांचा आढावा घेऊन इथे पोलीसांना सहकार्य करणाऱ्या 'नौपाडा रक्षक'या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तर, खारीगाव आणि ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे जाऊन तेथील विसर्जन व्यवस्थेची पाहणीही केली.
लालबाग परिसरात लोटला जगसागर
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लालबाग परिसरात जनसागर लोटला होता. पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. मुंबईत १३ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, ७० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची तयारी केली होती. वाहतूक पोलिसांनी गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. गणेश भक्त आणि प्रशासनाच्या समन्वयाने मोठ्या आनंदात व उत्साहात विसर्जन मिरवणुका पार पडल्या.