मुंबई - खासदार उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अमेझॉनवरुन आलेलं हे पार्सल आता परत पाठवा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील ४० गावांवर दाव केल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अंगात भूत शिरल्याचं ते म्हणाले. तर, नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंनाही लक्ष्य केले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे. सर्वांकडून गुळमुळीच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपाकडून मिळमिळीत प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही टपलीत मारावे असे राजकारण सुरु असल्याचे म्हणत वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, राज्यात सध्या काय सुरू आहे. महाराष्ट्राचे मंत्री गुजरातच्या प्रचारात व्यस्त असल्याने मंत्रीमंडळ बैठक रद्द झाली. तिकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून ४० गावांवर दावा केला जात आहे. मात्र, यावर राज्यकर्ते काहीही भूमिका घेत नाहीत. याउलट मुख्यमंत्री दिल्लीश्वरांचं ऐकत आहेत.
सध्या पहचान कौन सारखं झालंय, राज्याचे मुख्यमंत्री कोण हेच समजत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यासारखं ते वागत नाहीत. मुख्यमंत्र्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाही, जे वरचे सांगतात तेच ते बोलतात. दिल्लीवाल्यांचं ऐकणं हे बाळासाहेबांचं हिदुत्त्व आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. तसेच, मुख्यमंत्री आता म्हणतील काहीही घाबरायचं कारण नाही. मी पंतप्रधानांना बोललोय, प्रतंप्रधान म्हणालेत मी दुसऱ्या राज्यातली १०० गावं तुम्हाला देतो, एवढच, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, गुजरातच्या मतदानासाठी महाराष्ट्रातील नागरिकांना सुट्टी जाहीर करण्यात आली, त्यावरुनही निशाणा साधला. उद्या पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी भारतीय नागरिकांना सुट्टी देतील का? असेही ते म्हणाले.
राज्यपालांवर साधला निशाणा
ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमले जातेय का? असा सवाल ठाकरेंनी केंद्र सरकारला केला. राज्यपाल हे निपक्षपाती असावेत, राज्यात काही पेच झाला तर तो केंद्रात सोडवावे अशी भूमिका असायला हवी, परंतू ते तसे वागत नाहीएत. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातोय, असे ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची यांची हिंमत झाली. कोश्यारींनी आधी ठाणे, मुंबईच्या मराठी माणसांचा अपमान केला होता. सावित्रीबाईंबाबतही असेच बोलले होते, तेव्हा आपण जाऊदे होते कधी कधी असे म्हणून सोडून दिले होते. आता महाराजांचा अपमान केलाय, सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे हे पाहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.