मुंबई : मनोरंजन विश्वाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागच्या वर्षी महाराष्ट्रभर छेडण्यात आलेल्या रंगकर्मी आंदोलनानंतर पुढचे पाऊल टाकत रंगकर्मींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील पंचतारांकीत हॅाटेलमध्ये झालेल्या या अनौपचारीक भेटीदरम्यान मनोरंजन विश्वाने मुख्यमंत्र्यांसमोर आपले म्हणणे मांडले.
कोरोनाच्या काळानंतर मनोरंजन विश्वाची प्रचंड हानी झाली असून, रंगकर्मींना मिळणाऱ्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी, मनोरंजन विश्वाला जाचक असणाऱ्या कालबाह्य नियमांमध्ये उचित बदल करून नवीन नियमावली बनवण्याची मागणी कलाविश्वाने पुन्हा प्रशासनाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत रंगकर्मींसोबतच मनोरंजन विश्वाशी निगडीत कार्य करणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचा विचार असल्याची माहिती अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
विजय पाटकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत रंगकर्मींच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे सांगितले. प्रशांत दामलेंनी नाट्य व्यवसायाविषयक समस्या मांडल्या. इतरांनी चित्रपट आणि मालिकांना उद्भवणाऱ्या प्रश्नांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ओटीटीबाबतही चर्चा झाली. या भेटीत मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच पुन्हा एकदा रंगकर्मींना भेटणार असून, मनोरंजन विश्वाला भेडणवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पाटकरांनी सांगितले. यावेळी पाटकरांसोबत ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, मृणाल कुलकर्णी, विजय केंकरे असा जवळपास दोनशे लोकांचा समूह होता.