Join us  

"मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात", आदित्य ठाकरेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 8:45 PM

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या निविदावरून मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.

मुंबई  : रेसकोर्स नंतर आता पुन्हा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या निविदावरून मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्यानंतर आता पुन्हा अधिकच्या खर्चासाठी निविदा मागवण्यात येणार असून आम्ही पुन्हा एकदा यांचा घोटाळा उघड करण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिले आहे.

मुंबई पालिकेला ट्विटरवर टॅग करत आव्हान ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईसाठी आता सहा हजार कोटींच्याही वर जाऊन अधिकच्या खर्चासाठी आणखी एका रस्त्याची निविदा काढली जाणार आहे. असे करण्यापूर्वी आणि आम्ही पुन्हा एकदा त्यांचा घोटाळा उघड करण्याआधी, पालिकेने स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

२०२३-२४ च्या रस्त्यांची खरी स्थिती काय? असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ६०८० कोटींचा मेगा-रस्ता घोटाळा आम्ही उघड केला होता. बीएमसीला कंत्राटदारांना खूश करायचे असल्याने २०२२ या वर्षात रस्त्यांच्या कामाच्या निविदाच रद्द केल्या. ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केला आणि काम सुरू केले नाही, त्यांच्यावर काय कारवाई झाली? या घोटाळ्यातील आणि त्यापूर्वीच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांची यादी काय? जानेवारी २०२३ च्या निविदेची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही? जानेवारी २०२३ च्या निवदा घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का? अशा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरे यांनी केला.

भाजपा-मिंधे राजवटीच्या कंत्राटदार मित्रांसाठी बीएमसी मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही. ही आमच्या शहराची उघड लूट आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला की, लवकरच स्थापन होणारं आमचं सरकार या सर्व कामांना स्थगिती देणार असून या घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबवणार आहोत. या सोबतच घोटाळ्याची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा होईल याची काळजीही आम्ही घेणार आहोत.

गेल्या २ वर्षांपासून पालिका थेट घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्यातर्फे चालवली जात आहे. मुंबईचे १०० कोटी रुपये रेसकोर्सवरील खाजगी मालकीच्या घोड्यांच्या तबेल्यांवर खर्च करण्याच्या मूर्खपणाला पालिकेने मान्यता दिली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं एटीएम यंत्र म्हणून पाहत आहेत. पण आमच्यासाठी आमची  मुंबई आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणं आमच्या रक्तातच आहे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमुंबईमुंबई महानगरपालिका