मुंबई - ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्युप्रकरणी आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बोलताना विरोधकांना आणि टीकाकारांना लक्ष्य केलं. तसेच, या घटनेचं राजकारण करू नये, असे म्हणत डॉक्टर्स आणि तेथील स्टाफचीही बाजू पाहण्याचं सूचवलं. त्यानंतर, आता शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबई महापालिकेच्या कथित घोटाळ्याचा दाखल देत पलटवार केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यायला हवा, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ''मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. तेव्हा विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत. १९८६ मध्ये जे.जे. रुग्णालयातील १४ मृत्यूंवरून तत्कालीन आरोग्य मंत्री भाई सावंत यांनी राजीनामा दिला होता. ते मृत्यू दोन महिन्यांतील होते. कळवा रुग्णालयातील १८ मृत्यू २४ तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या 'सावंतां'नीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे. कारण प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला!'', असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
समित्या म्हणजे धुळफेकच
नातवाईकांच्या अश्रू सुकल्यावर मुख्यमंत्री तेथे पोहोचले. नेहमीप्रमाणे त्यांनी उच्चस्तरीय वगैरे चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने १० दिवसांत अहवाल द्यावा, असेही सांगितले. आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अशा अनेक चौकशी समित्या आल्या आणि गेल्या. त्यातील बहुतेक अहवाल धूळ खात पडले आहेत. या समित्या अनेकदा सरकारी धूळफेकच असते. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाबाबतही मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा वेगळे काही केलेले नाही. बरे, १० दिवसांनी खरेच चौकशी अहवाल आला आणि त्यानुसार एक-दोघांच्या बदल्या, निलंबन अशा कारवायांची तात्पुरती मलमपट्टी झालीच, तरी कळवा रुग्णालय काय पिंवा राज्यातील इतर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा काय, तेथील दुरवस्थेत काय मोठा आमूलाग्र बदल होणार आहे काय?, असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे.
आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत
मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत. प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला! बाकी मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्यदेखील बिघडलेलेच आहे. ते सुधारण्यासाठी जनतेलाच २०२४ मध्ये मोठी 'शस्त्रक्रिया' करावी लागणार आहे.