मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:05 PM2022-06-22T13:05:50+5:302022-06-22T13:07:15+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे
मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, अशी चर्चा असतानाच आता काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री अजिबात राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच, आमच्याकडे संख्याबळ आहे, आमचे सर्वच आमदार मुंबईत आणि आमच्यासोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे काय सांगतात हे मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माहिती देतना, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. तसेच, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कमलनाथ यांच्यासोबत त्यांनी दूरध्वनीवरुन चर्चा झाली असून आता ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावतील, असेही पटोले यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- राज्यमंत्री बच्चू कडू
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
शरद पवारांनी गृहखात्याला झापलं!
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित करत गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.