मुंबई: कांदिवली, सप्ताह मैदानावर शनिवारी अयोध्या नगरी उभारण्याचा प्रत्यय काल- समस्त कांदिवली व बोरिवलीकरांना आला. निमित्त होते उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टीं यांनी एक शाम राम के नाम’ तसेच त्यानंतर श्री राम भंडा-याचे आयोजन केले होते.
कांदिवली पश्चिम,कमला विहार स्पोर्ट्स क्लब समोरील सप्ताह मैदानात श्रीराम भक्तांचा जनसागर मोठ्या प्रमाणात लोटला होता. प्रवेशद्वारावर प्रभू श्री रामांची भव्य मूर्ती, अयोध्या नगरीची प्रतिकृती आणि राम, लक्ष्मण आणि सीतामाई तसेच विशाल रांगोळी बघून भक्तजन नतमस्तक होत होते. विविध ठिकाणांहून रामभक्त मोठ्या मिरवणूका काढून मुखी प्रभू श्री रामाचा जयघोष करत या मैदानात दाखल झाले.
या वेळी आठवणी जागवताना खा. गोपाळ शेट्टी म्हणाले की, १९९० मध्ये, मी प्रथमच एक उत्साही आणि समर्पित कारसेवक म्हणून अयोध्येला पोहोचलो. त्यानंतर 1991 मध्ये पुन्हा तिथे जाऊन ३०० किलोमीटर चालत गेलो, अटक झाल्यानंतर नैनी तुरुंगात होतो. ते म्हणाले की, या सर्व घटनांचा शेवट १९९२ मध्ये झाला जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडण्यात आली. मलाही ते पाहण्याचा बहुमान मिळाला. राम मंदिर बांधल्यानंतर अयोध्येला जाऊ शकलो नाही.दि,२० मे २०२४ रोजी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदानात शेवटचे मतदान होताच मी अयोध्येचा रस्ता धरला. मी व माझ्या कुटुंबाने चौथ्यांदा तिथे जाण्याचा निर्णय घेतला. भगवान श्री राम लल्ला यांची दिव्य मूर्ती पाहिल्यानंतर मला माझ्यात नवीन ऊर्जा जाणवत आहे. त्यामुळे माझ्या ४३ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये सोबत असणा-या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम होता. यापुढेही जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढा देणार असा निर्धार खा. गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.यावेळी आकर्षण ठरल्या त्या दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक आणि इंडियन आयडॉल विजेता गायक अभिजित सावंत. दोघांनीही आपल्या सुरांची मोहिनी घालून अबाल-वृध्दांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडले. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, भाजप राष्ट्रीय कार्यकारी सदस्य रघुनाथ कुळकर्णी, माजी आमदार हेमेंद्र मेहता, आ. अतुल भातखळकर, आ. मनिषा चौधरी, आ. भाई गिरकर, भाजप ज्येष्ठ नेते जे.पी.मिश्रा, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.