मुंबई- मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था वाढली असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ट्विट करुन भाजप नेत्यांनी केलेला दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.
सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते देशाची अर्थव्यवस्था वाढल्याचा दावा करत आहेत. या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. केंद्र सरकार आणि भाजप मधील नेते देशाची अर्थव्यवस्था वाढल्याचा दावा करत आहेत. हा दावा सपशेल खोटो ठरत असल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी आज ट्विट करुन हे आरोप केले. पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'एकीकडे देशात वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचारात आकंठ बुडाले आहेत, दुसरीकडे मात्र भारतातील बेरोजगारी देखील शिगेला पोहचली असून देशातील युवा बेरोजगारीच्या नैराश्यात आकंठ बुडाला, असा टोलाही लगावला आहे.
"सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या नुकत्याच प्रसिद्ध अहवालानुसार, देशातील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे १०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारी देखील वाढत आहे. हे चित्र विरोधाभासी आहे. बेरोजगारी वाढत असल्याने देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा केंद्र सरकार व भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.