मुंबई : उत्तर भारतात होत असलेल्या हिमवृष्टीचा तडाखा महाराष्ट्रालादेखील बसला असून, उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे अवघा महाराष्ट्र गारठला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात थंडीची मोठी लाट आली असून, येथील बहुतांशी जिल्ह्यांचे किमान तापमान एक आकडी नोंदविण्यात आले आहे. गारेगार वाऱ्यांमुळे मुंबईलाही हुडहुडी भरली आहे. मंगळवारी दुपारी मुंबईत कमाल तापमान २३ ते २६ अंश इतके होते. काही दिवसांपूर्वी जे किमान तापमान नोंद होत होते तेवढ्याच कमाल तापमानाची नोंद आता होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
२६ जानेवारी रोजी राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात शीत दिवस व शीत लहरीची शक्यता आहे. मुंबई दिवसा कमाल तापमानात घट झाली असून, हे कमाल तापमान २३ ते २६ अंश नोंदविण्यात येत आहे. - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग
कोणत्या जिल्ह्यांत थंडीची लाटधुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीडशहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येनाशिक ६.३, अहमदनगर ७.९, पुणे ८.५, जळगाव ८.६, मालेगाव ८.८, महाबळेश्वर ८.८, औरंगाबाद ८.८, बारामती ९.७, उस्मानाबाद ९.६, माथेरान १०, जेऊर १०, परभणी १०.८, जालना ११, सोलापूर ११.२, नांदेड १३.२, कोल्हापूर १३.८, मुंबई १३.४, सांगली १३.५, डहाणू १३.९, सातारा १४