नवरात्री आणि नऊ रंग याची उत्सुकता काही औरच. या प्रत्येक दिवसाचं आणि रंगाचं एक वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. हे रंग केवळ कपड्यांपुरते सीमित न राहता, मुलं आणि महिलांच्या आहारातही त्यांचा समावेश करून त्यांना उत्तम पोषण देता येईल, अशी कल्पना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. 'रंग नवरात्रीचा, रंग पोषणाचा' हा अभिनव उपक्रम घटस्थापनेपासून सर्व अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत आहे.
"आहारात वेगवेगळ्या रंगाचा समावेश असायला हवा, कारण हे रंग आपल्याला आवश्यक पोषणतत्त्वं पुरवतात, असं आहारशास्त्र सांगतं. हाच धागा पकडून, नवरात्रीच्या नऊ रंगाचा समावेश अंगणवाड्यांमधील आहारात करायचं ठरवलं, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं. प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार त्या दिवसाचा आहार आपण मुलांना देत आहोत, असं त्या म्हणाल्या.
पहिल्या दिवशी नारिंगी रंग होता. त्या दिवशी गाजर, संत्री यांचा समावेश आहारात करण्यात आला. सोमवारी पांढरा रंग असल्यानं काही ठिकाणी मोदक, करंजी, दूध-पोहे मुलांना देण्यात आले. त्या-त्या फळाचं किंवा भाजीचं महत्त्वही या निमित्तानं समजावलं जात आहे. अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक आहार नेहमीच दिला जातो. त्याला रंगांची जोड देऊन मुलांना सुदृढ करण्याचा महिला व बालविकास विभागाचा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे.