मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:12 AM2024-07-02T06:12:09+5:302024-07-02T06:13:15+5:30

जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष लोकमत परिवाराने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गतवर्षी साजरे केले.

The commemorative coin of Jawaharlal Darda will be released in the presence of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन

मुंबई - ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन आज, मंगळवार २ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न होणार आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत आपल्या लेखणीने व कर्तृत्वाने सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या बाबूजींच्या कार्याचा गौरव करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहतील. 

जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष लोकमत परिवाराने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गतवर्षी साजरे केले. बाबूजींवरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन केले. बाबूजींच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा परमोच्च बिंदू मंगळवारच्या नाण्याच्या विमोचनाने साधला जाणार आहे. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अ. भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव राज्यसभा सदस्य मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे मान्यवरांचे स्वागत करतील. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

कसे आहे नाणे?
जवाहरलाल दर्डा यांच्या स्मरणार्थ जारी केल्या जाणाऱ्या शंभर रुपयांच्या नाण्याचे वजन सुमारे ३५ ग्रॅम असून, त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, प्रत्येकी पाच टक्के निकेल व जस्त आहे. नाण्याची गोलाई ४४ मिलिमीटर आहे. त्यावर जवाहरलाल दर्डा यांचे चित्र आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे, असे हे नाणे आहे.

Web Title: The commemorative coin of Jawaharlal Darda will be released in the presence of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.