मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतल्या जात असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी येथे दिली. या नोटिशीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षावर होत असलेल्या राजकीय बैठका हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी एक्स या समाज माध्यमातून केली होती. याची दखल आयोगाने घेतली असून ‘वर्षा’वरील मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि उपसचिव नितीन दळवी यांना पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.