Join us

सामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाची निघणार लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 9:43 AM

पुढील सहा महिन्यांत लॉटरीसाठीची घरे तयार करत प्राधिकरण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करणार आहे.

मुंबई : येत्या २४ फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असतानाच म्हाडाच्यामुंबई मंडळानेही १ हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, पुढील सहा महिन्यांत लॉटरीसाठीची घरे तयार करत प्राधिकरण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यापूर्वीच ४ हजार घरांची लॉटरी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली होती. लॉटरीमधील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता पुढील लॉटरीची प्रक्रियाही मुंबई मंडळाने सुरू केली आहे. गोरेगाव पहाडी येथे लॉटरीमधील घरांसाठीचे काम सुरू असून, मुंबईत वेगवेगळ्या माध्यमांतून मिळणाऱ्या घरांचा समावेशही लॉटरीत केला जाणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सद्य:स्थितीमध्ये ३०० ते ३५० घरे लॉटरीसाठी आहेत. मात्र, लॉटरी काढण्यासाठी घरांची एवढी संख्या पुरेशी नाही. १ हजार घरांपेक्षा अधिक घरांची लॉटरी काढण्यासाठी तयार केली जात आहे. त्यानुसार, नियोजन केले जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी ही घरे असणार आहेत.- संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष, म्हाडा

प्रत्येक मंडळाची प्रत्येक वर्षी लॉटरी :

म्हाडाची मुंबई आणि कोकणसह राज्यभरातही इतर मंडळे आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीचा यात समावेश असून, या प्रत्येक मंडळाची प्रत्येक वर्षी घरांची लॉटरी काढण्याचा निर्धार प्राधिकरणाने केला आहे.

ऑनलाइन प्रक्रियेवर भर :

नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी काढली जाते. या प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदाराला प्रक्रियेत सहभागी होता येते. आता तर लॉटरीपश्चात प्रक्रियाही ऑनलाइन आहे.

यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविणे, तात्पुरते देकार पत्र पाठविणे, अर्जदाराने २५ टक्के विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, वितरण आदेश देणे, ताबा पत्र देणे, ताबा पत्राची प्रत संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे या प्रक्रिया ऑनलाइन आहेत.यामुळे बनावट, खोटी कागदपत्रे बनविणाऱ्यांना चाप बसत आहे. पत्रांवर क्यूआर कोड असून, कोडद्वारे कागदपत्रांची सत्यता तपासता येत आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडा