याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:59 AM2024-09-22T07:59:03+5:302024-09-22T07:59:20+5:30

इनकमिंग-आऊटगोईंगही जोरात

The competition of the aspirants has started to get the ticket in the assembly elections 2024 | याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच

याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच

महेश पवार

मुंबई : विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे सर्वच पक्षात इनकमिंग आणि आउटगोइंगला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी इच्छुकांची स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले अनेक जण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतात. या निवडणुकीतही अशा अपक्षांची संख्या लक्षणीय असणार आहे. 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ मतदारसंघातून ९० अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. वरळी आणि चांदिवली या दोन मतदारसंघांतून ७ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. बोरीवली, कांदिवली, कुर्ला, वांद्रे पश्चिम, सायन कोळीवाडा आणि शिवडी या सहा मतदारसंघांत एकही अपक्ष उमेदवार उभा नव्हता. अपक्ष उमेदवारांनी एकूण १,७६,०५५ इतकी मते घेतली होती. मात्र, अंधेरी (पूर्व) आणि वर्सोवा येथील अपक्ष उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी उमेदवाराला घाम फोडला होता. मुलुंडमध्ये ६, ३ मतदारसंघात ४, १० मतदारसंघात ३, ३ मतदारसंघात २ आणि ९ मतदारसंघात १ अपक्ष उमेदवार उभे होते. दुसरीकडे उमेदवारांना १,४२,०२७ इतकी नोटा मते मिळाली होती.

वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे नारायण राणे त्यांच्याविरोधात उभे होते. मात्र, तृप्ती सावंत यांनी त्यांचा पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याऐवजी ठाकरे गटाने विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सावंत यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीमुळे महाडेश्वर यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले. सिद्दीकी यांना ३८,३३७, महाडेश्वर यांना ३२,४७६ तर सावंत यांना २४,०७१ मते मिळाली होती. 

वर्सोवा मतदारसंघातही अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांनी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांसमोर आव्हान उभे केले होते. भाजप-सेना युती जागावाटपात ही जागा भाजपकडे आली. त्यामुळे शिवसेना नगरसेविका पटेल यांनी बंडखोरी केली होती, पण ३२,७०६ मते घेऊन त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. भाजपच्या भारती लव्हेकर यांना ४१,०५७ तर काँग्रेसचे बलदेव खोसा यांना ३५,८५४ मते मिळाली होती. 

अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेना उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. पटेल यांनी ४५,८०८ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती, तर काँग्रेसचे अमीन कुट्टी यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

जास्त नोटा मते 
१२,०३१ जोगेश्वरी
१०,०९५ बोरीवली
६,३०५  वरळी

कमी नोटा मते 
१,५३९ मुंबादेवी
१,८६९ धारावी
१,८७६ मानखुर्द
 

Web Title: The competition of the aspirants has started to get the ticket in the assembly elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.