Join us

"१९७३ ची संकल्पना, ४० वर्षे काहीच नाही; मोदींनीच केले भूमीपूजन अन् लोकार्पण"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 5:50 PM

आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. ‘अटलसेतू’चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच या पुलाचं उदघाटन करीत आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच 'अटल सेतू'चे उद्घाटन केले. त्यानंतर, अटल सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी, मोदींनी अटल सेतूबाबत योग्य ती माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. डिसेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदींनीच या पुलाची पायाभरणी केली होती. तर, २०२३ मध्य मोदींच्याचहस्ते देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे लोकार्पणही झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० वर्षे हा पुल केवळ संकल्पनेत होता, असे म्हटले.  

आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. ‘अटलसेतू’चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच या पुलाचं उदघाटन करीत आहेत. ही आमच्या कामाची गती आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. सन १९७३ मध्ये या मार्गाची संकल्पना निश्चित झाली. त्यानंतर ४० वर्ष काहीच झाले नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. काम करण्याची पद्धत बदलली आणि विकास कामांना गती मिळाली. आम्हाला सार्‍या मंजुरी तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरु झाले, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

राज्याच्या बजेटमधून हा प्रकल्प केला असता, तर विलंब झाला असता. आम्ही मोदींना विनंती केली, त्यांनी जपानशी बोलून जायकाकडून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे, हा प्रकल्प अतिशय गतीने पूर्ण होऊ शकला काही लोकांनी फ्लेमिंगोचा प्रश्न निर्माण केला. पण, आम्ही पर्यावरणाचे नियम पाळले आणि आज फ्लेमिंगोंची संख्या सुद्धा वाढते आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले. पहिल्यांदा मुंबई आणि एमएमआरला एकप्रकारचा रिंगरोड मिळाला आहे. मोदींनी संकल्पना मांडली की, मुंबईत एका टोकातून दुसर्‍या टोकाला जायचे असेल तर एक तासात पोहोचता आले पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो आहे, असेही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटले. 

देशातील सर्वात लांब सागरी पूल

अटल सेतू हा १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर बनलेला पूल आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला जोडण्याचे काम करेल. मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासासाठी लागणारा वेळ या अटल सेतूमुळे कमी होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई यांच्यातील अंतर २० मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या प्रवासाला २ तासाचा अवधी लागतो. त्यात वाहतूक कोंडीत अडकला तर त्यातून जास्त वेळ लागतो. परंतु या पूलामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल. त्याचसोबत वाहन चालकांना वेगवान प्रवास करत मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.

अटल सेतूवर १०० किमी प्रतितास वेगमर्यादा

अटल सेतूवरून प्रवास करताना वाहन चालकांना १०० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याची मर्यादा आहे. तसेच या सागरी महामार्गावर अवजड वाहने, दुचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर नेण्याची परवानगी नाही. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे.  मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल. अटल सेतूच्या एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. जर तुम्ही राउंड ट्रिप करत असाल तर तुम्हाला ३७५ रुपये मोजावे लागतील.

पुढील १०० वर्ष हा पूल कायम राहणार-

अटल सेतूच्या बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या पूलावरून दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील १०० वर्ष हा पूल कायम राहणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात वेगवान वारे आणि वादळाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीने लायटिंग पोल डिझाईन करण्यात आले आहे. विद्युत संकटकाळात कुठल्याही संभाव्य नुकसानीपासून वाचण्यासाठी लायटिंग प्रोटेक्शन सिस्टिम लावण्यात आली आहे. अटल सेतू हा मुख्यत: मुंबई - पुणे एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करेल. ज्यातून दळववळण करणे सोपे होईल. समुद्र तळापासून १५ मीटर उंचीवर पूलाचे बांधकाम करणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी