अंधेरीतील गोखले रेल्वे पुलाची संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:08 PM2022-11-09T18:08:11+5:302022-11-09T18:08:43+5:30

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष विनंती करण्यात आली आहे.

The concept of Gokhale railway bridge in Andheri will be finalized within a week | अंधेरीतील गोखले रेल्वे पुलाची संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित होणार

अंधेरीतील गोखले रेल्वे पुलाची संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित होणार

Next

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या संकल्पना आराखड्यावर आयआयटी मुंबई यांनी अत्यंत प्राधान्याने कार्यवाही करुन आठवडाभराच्या आत संकल्पना निश्चित करावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष विनंती करण्यात आली आहे. ही विनंती आयआयटी मुंबईने मान्य केली आहे. दरम्यान, गोखले पूल बंद झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवर वाहतूक सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने वाहतूक पोलिस, एमएमआरडीए आदींच्या सहाय्याने तातडीने उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले असून, मे २०२३ पर्यंत पुलाच्या २ मार्गिका खुल्या केल्या जाणार आहेत. तर सप्टेंबर २०२३ पर्यंत उर्वरित २ मार्गिका देखील खुल्या होणार आहेत. 

पूल बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग व वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज (दिनांक ९ नोव्हेंबर २०२२) प्रत्यक्ष भेट देऊन पूल परिसराची पाहणी केली.  अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. तथापि, सदर पुलाचे संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात आल्यानंतर सल्लागारांच्या सल्ल्यानुसार व प्रत्यक्ष पाहणीनंतर पुलाची जीर्ण होत असलेली परिस्थिती लक्षात घेता, सदर पूल सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असे असले तरी वाहतुकीसाठी विविध पर्यायी रस्ते उपलब्ध असून त्यांचा नागरिकांनी वापर करावा यासाठी फलकांच्या (होर्डिंग्ज) माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या परिसरातील वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच या पर्यायी मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहील, याचीदेखील काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त २०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.

पुढीलप्रमाणे निर्देश 

१) स्वामी विवेकानंद मार्गावर मेट्रो प्रकल्पाची विविध कामे सुरु आहेत. या कामांसाठी लावलेले संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) अरुंद करावेत. जेणेकरुन, वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध होईल, अशी विनंती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांनी ही विनंती मान्य केली आहे.

२) वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवरील फेरीवाले आणि अतिक्रमण २ दिवसांच्या आत हटविण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ ४) यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गांवर अनधिकृतरित्या वाहने उभी राहणार नाहीत, याची सुनिश्चिती करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

३) पर्यायी मार्गांवर वाहतूक सुलभरित्या सुरु रहावी, यासाठी रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पुनर्पृष्ठीकरण करावे, हे काम रात्री करावे, जेणेकरुन वाहतुकीला बाधा पोहोचणार नाही, असे निर्देश दोन्ही सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

४) गोखले रेल्वे पुलाचा संकल्पना आराखडा (डिझाईन) आयआयटी मुंबई यांच्याकडे फेर तपासणीसाठी देण्यात आला आहे. सदर संकल्पनेवर तातडीने कार्यवाही करुन त्यास अंतिम रुप देण्याची विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबई यांच्याशी संपर्क साधून केली आहे. सदर संकल्पना आठवड्याच्या आत अंतिम करण्याचे आयआयटी मुंबईने मान्य केले आहे. अंतिम मंजुरीसह संकल्पना प्राप्त होताच त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात येईल.

५) सदर पुलाचे काम अत्यंत प्राधान्याने हाती घेण्यात आले असून मे २०२३ पर्यंत २ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील. तर उर्वरित २ मार्गिका सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील.

- संकल्पनेची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची विनंती आयआयटी मुंबईकडून मान्य
- वाहतुकीसाठी असलेल्या पर्यायी मार्गांवर अडथळा ठरणारे फेरीवाले आणि अतिक्रमण येत्या २ दिवसांत हटवणार
- वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त २०० मनुष्यबळाची कुमक तैनात
- मे २०२३ पर्यंत पुलाच्या २ मार्गिका खुल्या करणार, सप्टेंबर २०२३ पर्यंत उर्वरित २ मार्गिका देखील खुल्या होणार
 

Web Title: The concept of Gokhale railway bridge in Andheri will be finalized within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई