मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जबर जखमी झालेल्या डॉ. अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती डॅरियस पंडोल यांना उपचारासाठी सोमवारी सकाळी गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविण्यात आले होते. गुरुवारी डॅरियस पंडोल यांच्या मनगटावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचप्रमाणे डॉ अनाहिता पंडोल अजूनही वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि प्रकृती सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
या अपघाताची घटना घडल्यानंतर सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या १० डॉक्टरांचे पथक वापी येथील रुग्णालयात संध्याकाळीच पोहचले होते. त्यांना मुंबईच्या रुग्णलयात हलविण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी दोन्ही रुग्णांना रस्त्यामार्गे ॲम्ब्युलन्सने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी पहाटेच त्यांना गिरगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विविध विषयातील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातर्फे त्यांच्या उपचाराकरिता शक्यतो सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.