मुंबई : खारदांडा कोळीवाडा परिसरात सोमवारी सकाळी वायू गळतीमुळे जी आग लागली होती, त्यामध्ये सहा जण भाजले असून, त्या सगळ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सर्वांवर ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी घटना घडल्यानंतर उपचारासाठी दोन रुग्णांना भाभा रुग्णालयात तर दोन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आले होते, तर दोन रुग्णांना नॅशनल बर्न्स सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मात्र भाभा आणि कस्तुरबा येथील रुग्णांना सुद्धा बर्न्स सेंटरमध्ये हलविण्यात आले. सर्वच रुग्णांना शरीरात खोल जखम झाली असून, सर्वांच्या फुप्फुसात जखमा झाल्या आहेत.
नॅशनल बर्न्स सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले की, सहा रुग्णांपैकी निकिता मंडलिक (२६) ४९ % आणि प्रियांका जैयस्वाल (२६) ४४ % यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाली. वंशिका चव्हाण (७) ६० % आणि प्रथम जैयस्वाल (६) ६० % यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांची जळालेली त्वचा काढून टाकण्यात येत असून, त्वचा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तर सखूबाई जैयस्वाल (६५) ८७ % टक्के भाजल्या आहे, तर सुनील जैयस्वाल (२८) ३२ % भाजले आहेत.