Join us

श्रीमंतांचा मतदारसंघ मतदानात ‘गरीब’, गेल्या वेळेपेक्षाही टक्का घसरला

By संतोष आंधळे | Published: May 22, 2024 3:18 PM

सुजाण आणि शैक्षणिकदृष्ट्या सजग असणाऱ्या मतदारांना त्यांच्या या कृतीतून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई : देशात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा दक्षिण मुंबई मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत मात्र अधिकच गरीब असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. या मतदारसंघातील निम्म्याहून कमी मतदारांनी खासदार निवडण्यासाठी मतदान केले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुजाण आणि शैक्षणिकदृष्ट्या सजग असणाऱ्या मतदारांना त्यांच्या या कृतीतून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. २०१९ मध्ये ५०.९७ टक्के मतदान झाले होते. यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल, असे अपेक्षित होते. मात्र त्यापेक्षा कमी म्हणजे ५०.०६ टक्के इतके मतदान यंदा झाले.

या मतदारसंघात एकूण १५,३२,२२६ मतदारांची नोंदणी झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट होत आहे. विविध मुद्द्यांवर इतर मतदारसंघांत गोंधळ झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले, त्या तुलनेत येथे कमी गोंधळ होता. मात्र, तरीही मतदान कमी झाले. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा क्षेत्रात येतात. लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून ५१.७७ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये येथे सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र यावेळी टक्का घसरला. नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के इतके सर्वांत कमी मतदान झाले. गेल्या निवडणुकीतही येथे कमी मतदान झाले होते. त्या तुलनेत आणखी कमी मतदान झाले. 

उन्हाळी सुट्ट्या, मतदानाच्या दिवसाआधी आलेल्या सलग तीन दिवस सुट्ट्या, मतदारांची उदासीनता आणि मतदान प्रक्रियेतील अडथळे त्यासोबतच उकाडा याचा फटका बसला.  उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित असताना तेथेही टक्का घसरला. तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघातही मतदानाचा टक्का कमी झाला आहे. महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यात सरळ लढत झाली. दोन्ही गटांकडून वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक आयोग आणि कर्मचारी तीन ते चार महिने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, टक्का वाढला तर नाहीच मात्र घसरला.

विधानसभानिहाय मतदानमतदारसंघ     २०१९      २०२४वरळी     १,३६,०३१    १,३०,८१२ शिवडी     १,४०,४६९     १,४०,७२९ भायखळा     १,३०,९८१     १,३२,८०३ मलबार हिल     १,४३,४२०     १,३२,९९५ मुंबादेवी     १,१५,९७६    १,१८,२०० कुलाबा     १,१७,७३३    १,१३,४७१ 

मनसेची मते कुणाला?  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. या मतदारसंघात मनसेची स्वतःची व्होट बँक आहे. कारण येथे मनसेने निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना भरघोस मतदान झाले होते.  दोन्ही उमेदवार मराठी असल्याने मराठी मतांचे विभाजन होणार हे निश्चित असले तरी मनसेची मते कुणाला मिळतात, हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. 

 यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली असल्याने मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदान महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र होते. महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने चांगली मेहनत घेतली होती.  तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाला मानणारा मतदार किती साथ देतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४