मुंबई : विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा घेतला. त्यानंतर महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यावरील शिवसेना पक्ष कार्यालयसुद्धा शिंदे गटाकडून ताब्यात घेतले जाईल, या धास्तीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी मुख्यालयात धाव घेतली. त्यांनी तेथेच तळ ठोकून शिवसेना कार्यालयाबाहेर एकप्रकारे जागता पहाराच दिला.
शिंदे गटाचे समर्थक तेथे आले तर तणाव निर्माण होऊ शकतोे, असे महापालिकेत बोलले जात आहे. पालिका मुख्यालयासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पालिकेच्या सर्व प्रवेशद्वारांवर अतिरिक्त कुमक होती. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि त्याचे कार्यकर्ते पालिकेत आले होते. त्यांनी शिवसेना कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता. मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये पालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेण्यासाठी शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेवक शीतल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, अशोक जाधव आदी आक्रमक झाले होते. दोन्ही गट आमनेसामने आले; मात्र संघर्ष टळला होता. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी सर्वांना बाहेर काढले होते.