लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एक रुपयात पीकविमा देण्याची सरकारने घोषणा केली. पण या एका रुपयासाठी शेतकऱ्याला सेवा केंद्रात अडीचशे रुपये मोजावे लागतात. विम्याचा प्रीमिअम भरायला शेतकरी तयार होता, मात्र पीकविमा कंपन्या नुकसान झाले तरी भरपाई देत नाहीत, त्याबाबत सरकार काही करत नाही, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
विधानसभेत सत्ताधारी पक्षाने नियम २९३ अन्वये शेतकऱ्यांविषयी उपस्थित केलेल्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. राज्य सरकारने मागील अधिवेशनात कांद्याचे अनुदान जाहीर केले, पण शेतकऱ्यांना अजूनही ते मिळालेले नाही. या सरकारचा एक दिवस बळीराजासाठी आहे आणि बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी असल्याची टीकाही थोरात यांनी केली.
खर्च ३०० रुपये
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : पीक विमा भरण्याची रक्कम अवघी एक रुपया असली तरी त्यासाठी शेतकऱ्याला अडीचशे ते तीनशे रुपये खर्च करावे लागत आहेत. पीक विमा भरण्याच्या नियमाला सोलापूर जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र, सीएससी चालकांकडून हरताळ फासण्याचे काम होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सोमवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.