महामार्गांवरील पुलांच्या डागडुजीचा खर्च वाढता वाढे; महापालिकेच्या माथी २१ कोटींचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:31 PM2024-10-18T13:31:02+5:302024-10-18T13:31:39+5:30
...यापैकी पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या डागडुजीसाठी पालिकेला २१ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांच्या देखभालीचे जोखड मुंबई महापालिकेला दिवसेंदिवस आणखी जड जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. यापैकी पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या डागडुजीसाठी पालिकेला २१ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल आणि मुलुंड येथील नवघर उड्डाणपूल यांचे एमएमआरडीएने ‘आयआयटी’च्या मदतीने स्ट्रक्चरल ऑडिट केले. हा अहवाल संस्थेने पालिकेला सादर केला. त्यानंतर या महामार्गावरील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेतला. तांत्रिक सल्लागार म्हणून आयआयटीची नियुक्ती केली. त्यांच्या अहवालानुसार डागडुजीचा निर्णय घेण्यात आला.
सप्टेंबरमध्ये प्रस्ताव मंजूर
- या कामासाठी जूनमध्ये निविदा मागवण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
- त्याकरिता पी. बी. कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून, कंपनीने २८ टक्के उणे दरात काम मिळवले आहे.
अँटी क्रश बॅरिअरची कामे
- रेल्वे मार्गांवरील विविध उड्डाणपुलांवर रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अँटी क्रश बॅरिअर बसविण्याच्या सूचना पालिकेच्या पूल विभागाला केल्या होत्या. त्यानुसार या कामांचाही समावेश केला आहे.
- चेंबूर येथील सुमननगर, अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल, मुलुंड येथील नवघर उड्डाणपूल, कुर्ला पश्चिम येथील एलबीएस जंक्शन एससीएलआर उड्डाणपूल, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील उड्डाणपूल, सायन-पनवेल महामार्ग आणि महाराष्ट्रनगर-मानखुर्द यांना जोडणारा भुयारी मार्ग आणि रेल्वे उड्डाणपुलांवर अँटी क्रश बॅरिअर अशी कामे होणार आहेत.