Join us

जनऔषधी केंद्रांत सॅनिटरी पॅड स्वस्त; दर्जाही आहे चांगला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:07 PM

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची किंमत कमी करण्यात आली आहे.

मुंबई : जनऔषधी केंद्रांमध्ये औषधांसह सॅनिटरी पॅड स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे मिळत असल्याने केंद्र सरकारकडून आता औषधांसाठी डॉक्टरांकडे आग्रह धरा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रात सॅनिटरी पॅड 

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची किंमत कमी करण्यात आली आहे. जनऔषधी  केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे हे पॅड पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जैव-विघटनशील आहे. हे साहित्य ‘एएसटीएम डी-६९५४’ मानकांनुसार बनविण्यात आले आहेत.

जनऔषधी लिहून देण्याचा आग्रह धरा

वर्षानुवर्षे डॉक्टरांकडून ब्रँडेड औषधांचे प्रिस्क्रिप्शन देण्यात येते. त्यामुळे जेनेरिक म्हणजेच जनऔषधांबाबत जनजागृती नाही वा तुलनेत विश्वासार्हता कमी आहे. परंतु आता केंद्र सरकारकडून तसेच आरोग्य विभागाकडून डॉक्टरांकडे जनऔषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचा आग्रह धरा, असे सांगण्यात आले आहे.

जनजागृतीसाठी प्रयत्नशील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जनऔषध केंद्राविषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात येतात. नुकताच राज्याच्या आरोग्य विभागानेही राज्यव्यापी उपक्रम घेतला होता, मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शहरात कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे याविषयी अधिकाधिक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे के. जी. गाडेवार यांनी दिली आहे.

ब्रँडेड औषधांच्या तुलनेत स्वस्त शहर, उपनगरांत मिळून ३७ जनऔषधी केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. या सर्व जनऔषध केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स १ रूपये प्रतिपॅड दराने उपलब्ध करून दिले जात आहेत.

टॅग्स :महिला