विक्रोळी उड्डाणपुलाचा खर्च ५१ कोटींनी वाढला, काम रखडल्याने तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:58 PM2023-08-01T13:58:05+5:302023-08-01T14:00:00+5:30
२०१८ मध्ये मंजुरी मिळालेला हा पूल नक्की कधी तयार होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. अद्याप काम पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई : विक्रोळी उड्डाणपुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू असून, हा पूल पालिका तसेच मध्य रेल्वे एकत्रितरीत्या बांधत आहे. काम रखडल्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च तब्बल ५१ कोटींनी वाढला आहे. २०१८ मध्ये मंजुरी मिळालेला हा पूल नक्की कधी तयार होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. अद्याप काम पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
विक्रोळी स्थानकात पूर्वेहून पश्चिमेला जाण्यासाठी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. १४ मार्च २०१८ मध्ये स्थायी समितीत या पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली तर मे २०१८ मध्ये या कामाला सुरुवात झाली. या पुलाचे काम करण्यासाठी एच. व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनीला ४५.७७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणे आवश्यक असतानाही काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला पुलाच्या बांधकामासाठी निविदा काढली होती. मात्र, दोनदा या खर्चात वाढ झाली. त्यामुळे खर्च ७९ कोटी २० लाख ३९ हजारांवर पोहोचला. तर विविध करांमुळे हा खर्च आता ९७.३७ कोटींवर पोहोचला आहे.
२ जून, २०२४ पर्यंत पूल उभारावा लागणार
पुलाच्या सुपर स्ट्रक्चर डिझाइनमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे खर्च वाढला. तर रेल्वे या पुलासाठी स्टील गर्डर वापरणार असून आयआयटीने नव्याने अभिप्राय नोंदविल्याने या पुलाचे काम लांबले आहे. आता २ जून २०२४ ही डेडलाइन पुलासाठी निश्चित केली आहे.