अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:33 AM2022-05-03T10:33:58+5:302022-05-03T10:34:29+5:30
मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई-
मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अल्टिमेटमवर देश चालत नाही. या देशात आणि राज्यात कायद्याचं राज्य आहे. धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही. त्यांच्यामागे काही अतृत्प आत्मे आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"अल्टिमेटमवर वगैरेला शिवसेना भिक घालत नाही. राज्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. बिनहिमतीचे लोक असं छोटे मोठे पक्ष पकडून आमच्यावर हल्ले करत आहेत. पण त्याचा काहीच फायदा होणार नाही. लोक सुज्ञ आहेत. कुणीही राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकत नाही. धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही. त्यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा. अल्टिमेटम कसले देता. सुपारी देणाऱ्यांचा आधी शोध घेतला पाहिजे", असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात शरद पवार यांच्यासारखं अनुभवी राष्ट्रीय नेतृत्व, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असे अनुभवी नेते राज्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि भक्कम राज्यात असं धार्मिक तेढ निर्माण करुन वातावरण बिघडवणं काही सोपं नाही. जनता सुज्ञ आहे, असंही राऊत म्हणाले.