Join us  

देशाची अर्थव्यवस्था संकटात, जितेंद्र आव्हाडांनी मांडलं भारत-इंग्लंडचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 4:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - देशात महागाईने उच्च्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे. तेल, दूध, मीठ, गॅस यांसह जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने विरोधकांकडून मोदी सरकावर सातत्याने टिका करण्यात येते. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महागाईवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले होते. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशातील अर्थव्यवस्थेवरुन सरकारवर टिका केली आहे. तसेच, मोदी सरकारचं समर्थन करणाऱ्यांनाही उदाहरण दाखवून दिलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "इंग्लंडचा जीडीपी ३.२ ट्रिलियन आहे. भारताचा ३.५ ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त ६.८ कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना इंग्लंडसोबत करणाऱ्यांना आव्हाड यांनी इंग्लंड आणि भारत यांच्यातील लोकसंख्येचा फरकही समजावून सांगितला. 

दरम्यान, आव्हाड यांनी याआधी आणखी एक ट्वीट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. "भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच भारतावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण ६२०.७० अब्ज डॉलर्स पार गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे?" असं म्हटलं होतं. 

आव्हाड यांच्यावर भाजपचा पटलवार

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर पलटवार केला आहे. "पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत. ३.५ ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले ही त्यांच्या दृष्टीने achivement नाही. पण, मग हे ७० वर्षात काँग्रेसला का झेपले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हे शक्य कसे झाले?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडनिर्मला सीतारामनअर्थव्यवस्थामहागाई