मुंबई : देशांतर्गत अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होत असून देशाचा विस्कटलेला अर्थगाडा रुळावर येत असल्याचे पहायला मिळत आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन तब्बल ४८ टक्क्यांनी वाढले आहे, तर आगाऊ कर संकलनात ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना महामारीच्या दोन लाटानंतरही देशाची आर्थिक वाढ गतीने होत आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन ज्यामध्ये वैयक्तिक उत्पन्नावरील प्राप्तिकर, कंपन्यांच्या नफ्यावर कॉर्पोरेशन कर, मालमत्ता कराचे प्रमाण २०१९-२० च्या तुलनेत ३५ टक्क्यांहून अधिक आहे.
कर संकलन किती?
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२१ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात १६ मार्च २०२२ पर्यंत प्रत्यक्ष करांचे निव्वळ संकलन १३.६३ लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षात याच कालावधीत ९.१८ लाख कोटी रुपये होते.