Join us

कोर्ट म्हणाले, ही कसली लोकशाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 6:59 AM

पानसरेंच्या पुस्तकावरून प्राध्यापिकेवर कारवाई, पोलिसांना झापले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका प्राध्यापिकेने  दिवंगत गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ दिल्याने पोलिसांनी तिच्या महाविद्यालयाला पत्र लिहिले. त्यानंतर महाविद्यालयाने तिची चौकशी सुरू केली. या घटनेवर संताप व्यक्त करत न्यायालयाने ‘ही कसली लोकशाही?’ असा सवाल करत पोलिसांची  खरडपट्टी काढली.

सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या प्राध्यापिका मृणालिनी अहिरे यांनी कॉलेजच्या ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांचे सहकारी प्रा. विनायकराव जाधव यांनी आदरणीय व्यक्तिमत्त्वांविरोधात टिप्पणी केल्याने काही विद्यार्थ्यांनी जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यांना रोखण्यासाठी अहिरे यांनी गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा हवाला दिला होता. हे प्रकरण पोलिसांत गेले होते.

इंग्रजी पदवीधर तपास अधिकाऱ्यांना खडे बोलnतपास अधिकारी इंग्रजी विषयात पदवीधर आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला म्हणून मराठी साहित्य आणि संस्कृती ते विसरले का? संबंधित पुस्तक वाचा, राज्यघटना वाचा विशेषत: अनुच्छेद १९ (१) (ए) (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) वाचा आणि मग गुन्हा घडला, असे वाटले तर आम्हाला कळवा.

पोलिसांनी मर्यादा ओलांडली आहे. तुम्ही खासगी संस्थेला कोणावरही कारवाई करण्यास सांगू शकत नाही. तुम्ही स्वत: कारवाई करू शकला असता, पण कॉलेजला कारवाई करण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे कोर्ट म्हणाले.

टॅग्स :न्यायालय