कुचंबणा थांबणार; उपनगरांतील मोडलेली स्वच्छतागृहे सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 11:22 AM2024-03-15T11:22:38+5:302024-03-15T11:23:33+5:30

८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती, तर १५ टक्के पुनर्बांधणीची कामे.

the cramping will stop repaired broken toilets in suburbs in mumbai | कुचंबणा थांबणार; उपनगरांतील मोडलेली स्वच्छतागृहे सुधारली

कुचंबणा थांबणार; उपनगरांतील मोडलेली स्वच्छतागृहे सुधारली

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात पालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. या कामांसाठी मुंबई उपनगरे जिल्हा नियोजन समितीकडून १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने २९८७ पैकी १५०४ शौचालयांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ८५ टक्के  शौचालयांची (१२७७) दुरुस्ती, तर १५ टक्के शौचालयांची (२२७) पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

उपनगरातील शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. म्हाडाने मुंबईत बांधलेली ३९१३ पैकी २९८७ सार्वजनिक शौचालये पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. या शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे लोढा यांच्या पुढाकाराने आणि पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहेत. 

... म्हणून पालिकेकडे हस्तांतरित 

म्हाडाने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि दुरुस्ती त्यांच्याकडून केली जात होती. मुंबई उपनगरांतील झोपडपट्टी परिसरात ही शौचालये अधिक प्रमाणात होती. मात्र, काही वर्षांपासून त्यांची दुरवस्था पाहता पुनर्बांधणी व दुरुस्तीची गरज होती. त्यामुळे लोढा यांनी म्हाडाकडील २,९८७ शौचालये पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पुढाकार घेतला. 

शौचालयांचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली. 

जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ साठी ५० कोटींचा निधी पालिकेकडे वर्ग केला आहे. तसेच २०२३-२४ या वर्षासाठी १३८ कोटींचा निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यातून या शौचालयांची कामे करण्यात येत आहेत.

११ हजार वस्ती सुधार योजनेची कामे -

मुंबई उपनगरे जिल्ह्यातील सार्वजनिक शौचालयात सध्या ७००४ इतकी शौचकुपे आहेत. पालिकेने वस्ती सुधार योजनेची लॉट १२ अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर ही संख्या ७००४ वरून ११ हजार ७६९ पर्यंत नेण्यात येणार आहे. यासह सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठीही पालिका प्रयत्नशील  असल्याचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. 

आरसीसी प्रकारच्या शौचालयांचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येत्या २४ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. झोपडट्ट्यांतील नागरिकांसाठी सुविधा शौचालये, तसेच कपडे धुण्यासाठी वाॅशिंग मशीन, सौर उर्जा, स्नानगृहे, स्वतंत्र शौचकुपे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

मुंबई उपनगरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळी उच्च दर्जाच्या सुविधा असलेली शौचालयेही या प्रकल्पांतर्गत उभारणार आहेत.

Web Title: the cramping will stop repaired broken toilets in suburbs in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.