नालासोपारा :- महामार्गालगत मोकळ्या शेतातील नाल्याच्या दाट झाडाझुडुपामध्ये सडलेल्या मृतदेहाची ७२ तासांत ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमने केला आहे. या हत्येप्रकरणी २ आरोपी अटक असून १ विधिसंघर्ष आरोपी फरार आहे. या मयताची ओळख पटविण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मयताचे फोटो, अंगावरील कपडे व वस्तू यांचे तब्बल १ हजार पत्रके भिंतीवर चिपकवून व सार्वजनिक ठिकाणी वाटण्यात आली. मयताच्या पायातील दोरा आणि चप्पलमूळे ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने या हत्येचा उलगडा केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महामार्गावरील बाफाने ओव्हर ब्रीजच्या लगत असलेल्या मोकळ्या शेतातील नाल्याच्या दाट झाडाझुडुपामध्ये २५ ते २० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या स्वरूपातील मृतदेह २२ नोव्हेंबरला आढळुन आला होता. त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद नायगांव पोलिसांनी केली होती. मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवल्यावर त्याच्या डोक्यात दगड तसेच इतर हत्याराने गंभीर दुखापत करून हत्या केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यावर नायगांव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निर्जळ स्थळी टाकलेल्या मयताचे प्रेत पुर्णपणे कुजून व सडून शरीरावरील त्वचा गळून हाडांचा सापळा सापडलेल्या मयताची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. वरिष्ठांनी दाखल गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोनला सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी तीन पथके बनवून मिसिंग तपास सुरू केला. त्यावेळी ८ नोव्हेंबरला नायगाव पोलीस ठाण्यात २३ वर्षाचा लवेश माळी हा मिसिंग असल्याचज माहिती मिळाली. मयताच्या अंगावरील कपड्यांवरून त्याच्या नातेवाईकांनी ओळख पटली. मयताला दररोज अंमली पदार्थांची नशा करण्याची सवय असल्याने त्याच्यासोबतच्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लवेश याच्या सोबत नशा करणाऱ्यांनी त्याची हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. एका प्रत्यक्षदर्शीकडे पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी करत आरोपींची नावे निष्पन्न केली. नायगांवच्या चंद्रपाडा येथून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ नोव्हेंबरला मयत लवेशने आरोपीची रिक्षा चालविताना डंपरला मागून ठोकल्याने रिक्षाची काच फुटून नुकसान झाल्याने आरोपीचा त्याच्यावर राग होता. गुन्ह्यातील तिन्ही आरोपी आणि प्रत्यक्षदर्शीच्या झोपडीमध्ये एकत्र नशा केली. त्यावेळी विधिसंघर्ष बालकाच्या खिशातून मयत लवेश याने ५ हजार रुपये चोरल्याचा संशय घेऊन त्याला ठोशाबुक्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून जीवे ठार मारत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझुडुपांमध्ये फेकून दिल्याचे कबूल केले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवल, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, मसुब केकान चौधरी, सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.