लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना पालिका प्रशासनाने दिलासा दिला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांची मागणी व आगामी निवडणूक लक्षात घेता यंदा पाणीपट्टीत दरवाढ न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावातील पाणीसाठा पाहता ३० जूननंतरच पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दिली.
या धरणातून मुंबईत पाणी आणण्याचा खर्च कोट्यवधींचा असून, हा खर्च पाहता पालिकेने २०१२ मध्ये दरवर्षी किमान ८ टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात पालिकेने पाणीपट्टी न वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२१ मध्ये ५.२९ टक्के, २०२२ मध्ये ७.१२ टक्के, तर आता २०२३ मध्ये ६ ते ७ टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय प्राथमिक स्तरावर घेण्यात आला होता. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव व इतर तलावातील राखीव साठ्यातील तलावांत १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुढील ४८ दिवस पाणी पुरेल, असे पी. वेलरासू म्हणाले.
असे आहेत पाण्याचे दर (प्रति हजार लिटर/रुपये)
- झोपडपट्टीत पाण्याचे दर- ५.२८
- इमारती व अन्य ग्राहकांसाठी- ६.३६
- व्यावसायिक वापरासाठी- ४७.६५
- अव्यावसायिक वापरासाठी- २५.२६
- उद्योग कारखाने- ६३.६२
- रेस कोर्स, थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेल- ९५.४९