सगळं काही ठरल्याप्रमाणे होत आहे; ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न
By अतुल कुलकर्णी | Published: March 27, 2023 08:55 AM2023-03-27T08:55:09+5:302023-03-27T09:17:36+5:30
मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार जनतेसमोर आणायचा आणि ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करायची ही ठरवलेली स्क्रिप्ट आहे.
विद्यमान सरकारने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई महापालिकेची कॅगमार्फत चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यास राज्य सरकारने जर काही निधी दिला तर राज्य सरकार त्याचे लेखापरीक्षण करू शकते. कॅग ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. केंद्राने दिलेल्या निधीपुरतेच लेखापरीक्षण करणे कॅगकडून अभिप्रेत आहे. ज्या योजनांना केंद्राचा निधी दिलेला नाही त्यांचे लेखापरीक्षण कॅगने केले आणि अवघ्या तीन महिन्यांत त्याचा अहवाल दिला.
लेखापरीक्षणाची एक पद्धत आहे. ऑडिट केल्यानंतर संबंधित विभागाला त्यांचे निष्कर्ष लिखित स्वरूपात पाठवले जातात. त्यावर संबंधित विभागाचे म्हणणे विचारले जाते. त्यानंतर जर त्यांचे समाधान झाले नाही, तर ऑडिटर त्यांचे अभिप्राय ऑडिट रिपोर्टमध्ये लिहितात. शनिवारी विधानसभेत कॅगने जो अहवाल दिला त्यात महापालिकेचे म्हणणे घेतले की नाही? घेतले असेल तर या मुद्द्यांवर महापालिकेने काय सांगितले..? याचे तपशील समोर आलेले नाहीत. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी याच कॉलममध्ये कॅगचे रिपोर्ट येत्या दोन-तीन महिन्यांत येतील, असे आम्ही लिहिले होते.
त्यानुसारच अवघ्या तीन महिन्यांत कॅगचा रिपोर्ट आला. अपेक्षेप्रमाणे मुंबईमहापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. याचा अर्थ कॅगने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करू नये असा होत नाही. मात्र सगळ्या गोष्टी राजकीय चण्यातूनच कशा पाहिल्या जात आहेत, त्याचे हे उत्तम भा उदाहरण आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाणही शिंदे यांना मिळाले. गेल्या काही दिवसांत या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यातून शिंदे गटाचा फायदा होत असल्याचे दिसत नाही.
उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती कमी होईल असे वाटत असताना, तसे चित्रही दिसत नाही. पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेली मते भाजप आणि शिंदे गटासाठी चिंतेचा विषय आहे. मुंबई महापालिकेत अजून तरी शिंदे गटासोबत उघडपणे जायची भाषा कोणत्या माजी नगरसेवकांनी केल्याचे दिसत नाही म्हणावी तेवढी ही निवडणूक सोपी नाही,असे शिंदे गटाचे नेते खासगीत मान्य करतात. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करायची. त्यातला भ्रष्टाचार जनतेसमोर आणायचा आणि सहानुभूतीची तीव्रता कमी करायची ही ठरवलेली स्क्रिप्ट आहे.
आगे आगे देखो होता है क्या.... है उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पुरेसे बोलके आहे. अत्यंत शांतपणे विचारपूर्वक राजकीय खेळी खेळण्यात फडणवीस माहीर आहेत. भावनेच्या किती आहारी जायचे आणि व्यावहारिकता कुठे दाखवायची हे स्क्रिप्ट त्यांनी व्यवस्थित लिहून काढली आहे. त्यानुसारच त्यांची पावले पडत आहेत. ठाणे महापालिकेत जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले होते. आता त्यांनी मुंबईत सदा सरवणकर रिव्हॉल्व्हरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सांगितले आहे. सरवणकर शिंदे गटात गेले आहेत. आहेर हे शिंदेंच्या जवळचे मानले जातात. असे असताना एकीकडे कॅगचा रिपोर्ट आणायचा, दुसरीकडे शिंदे गटाकडेही करडी नजर ठेवायची. फडणवीस यांच्या मनात काय आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही.
एक मात्र खरे, की मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी होता होईल तेवढे उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेचे खच्चीकरण करायचे. जे काही भावनिक सहानुभूतीचे वातावरण आहे ते पूर्णपणे नष्ट करायचे, त्यानंतरच निवडणुकांना सामोरे जायचे, हे ठरलेले आहे. आज राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. पर्यायाने सर्व महापालिकांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. भाजप नेते जे सांगतील तेच होत आहे. त्यामुळे वेगळ्या निवडणुका घेऊन कोणाची सत्ता येईल याची परीक्षा घेण्यापेक्षा जे चालले आहे ते चांगले आहे, असा पक्का विचार यामागे आहे. घरात एखादा नातेवाईक जग सोडून गेला तर लोक काही काळ शोक व्यक्त करतात.
पुन्हा सगळं विसरून आपापल्या कामाला लागतात. हे तर राजकारण आहे. सहानुभूती किती काळ टिकेल..? नवनवे विषय पुढे येत जातील, तसतसे राजकीय वातावरण बदलत जाईल. त्यात राज ठाकरे यांच्या सभेनंतर एका ठाकरेंना दुसरे ठाकरे पर्याय होऊ शकतात, हा संदेश देण्याचे कामही सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांची मते भाजपला मिळाली नाही तरी ती राज ठाकरे यांना मिळतील, अशी व्यवस्था येत्या काळात केली जाईल. तसा अभ्यासक्रम लिहिणे सुरू झाले आहे. अधूनमधून या अभ्यासक्रमाच्या चाचणी परीक्षा सुरू आहेतच.
गुढीपाडव्याला झालेली सभा, त्यात राज ठाकरे यांनी केलेले भाषण तत्काळ दुसऱ्या दिवशीमाहीमच्या समुद्रातून हटविण्यात आलेली मजार. एकाला शिवधनुष्य पेलले नाही. दुसऱ्याला पेलेल का ते माहिती नाही, असे राज ठाकरे यांचे विधान हे सगळे चाचणी परीक्षेचा एक भाग असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. सगळं काही आम्ही ठरवल्याप्रमाणे घडत आहे, असे सांगायला भाजप नेते विसरत नाहीत. असे सांगण्यामागे परसेप्शन तयार करणे हादेखील एक भाग आहे. सतत एखादी गोष्ट चुकीची आहे असे सांगितले की लोकांना ती चुकीची वाटू लागते. या सूत्रावर भाजपचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे भाजपच्या कथेला धक्का देणारी एखादी नवी कथा जर कोणी लिहिली आणि ती लोकांना आवडली तर राजकीय वातावरणात तेवढाच बदल.....