Join us

१० जूनला उघडणार यशवंत नाट्य मंदिराचा पडदा!

By संजय घावरे | Published: May 16, 2024 8:24 PM

वातानुकूलित यंत्रणेचे काम पूर्ण; लिफ्ट बसवण्यासोबत इतर बरीच कामे बाकी

मुंबई - १ फेब्रुवारीपासून बंद असलेले माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर पुन्हा सुरू करण्याचा १ मेचा मुहूर्त हुकला असून, अद्याप बरीच काम बाकी आहेत. आता १० जून रोजी 'यशवंत'चा पडदा उघडण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे.

यशवंत नाट्य मंदिर १ फेब्रुवारीपासून व्यावसायिक नाटकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने दिलेल्या निधीतून नाट्यगृहात अग्निशमन यंत्रणा आणि वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासोबतच नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण होऊन नाट्यगृह पुन्हा रसिकांच्या सेवेत रुजू होईल असा अंदाज काम सुरू करताना व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे १ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर पुन्हा सुरू होईल अशी आशा होती, पण तसे झाले नाही. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर त्यांनी कोरोनापासून बंद असलेले नाट्यगृह प्रचंड वेगाने कामे करून पुन्हा सुरू करून तिथे गो. ब. देवल स्मृतीदिन मोठ्या दिमाखात साजरा केला होता. १४ जूनला महिन्यापेक्षा कमी अवधी उरल्याने यंदाचा गो. ब. देवल स्मृतिदिन यशवंतमध्येच साजरा करणे हे नाट्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. यासाठी कार्यकारिणीसोबतच नाट्यगृहाचे व्यवस्थापन विशेष मेहनत घेत आहे. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनीही गो. ब. देवल स्मृतीदिन यशवंतमध्येच साजरा होईल असे म्हटल्याने त्या पूर्वीच म्हणजे १० जूनपासून 'यशवंत'चा पडदा पुन्हा उघडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

नूतनीकरणानंतरच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये बरेच बदल केल्याचे पाहायला मिळतील. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट बसवण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठून लिफ्टचा वापर करणे सोपे होईल त्याची चाचपणी केली जात आहे. अद्याप लिफ्ट आणण्यात आलेली नाही. नूतनीकरणाची सर्व कामे पूर्ण झाल्यावर काही दिवस नवीन यंत्रणांची चाचणी घेण्यात येणार आहे. पुन्हा कुठे पाणी गळत नाही याची खात्री करून त्यानंतरच नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये बाल्कनीबाहेर फरशी बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या मजल्यावर म्हणजेच स्टॉलच्या मागील भागात बाहेरील बाजूला विविध कामे सुरू आहेत. मुख्य सभागृहाबाहेरील तसेच आतील खूप काम शिल्लक आहे. सभागृहातील खुर्च्या काढलेल्या असून, आत बांबू बांधून काम सुरू आहे. रंगमंचावर बांधकामाचे साहित्य तसेच खुर्च्या ठेवलेल्या आहेत. प्रवेशद्वारपासून मुख्य सभागृहापर्यंत फरशीचे काम अद्याप झालेले नाही. तालीम हॉलमधील वातानुकूलित यंत्रणा, फ्लोरिंग आणि स्वच्छतागृहाचे कामही चांगले झाले आहे. 

टॅग्स :मुंबई