मुंबई उत्तर-पश्चिम विभागातील रोजची वाहतूक कोंडी सर्व सामान्यांना ठरते डोकेदुखी
By मनोहर कुंभेजकर | Published: April 25, 2024 05:19 PM2024-04-25T17:19:47+5:302024-04-25T17:22:03+5:30
या मतदार संघातील नागरिक, प्रवासी – वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : कांदिवली पूर्व लोखंडवाला पासून ते अंधेरी पूर्व सहार रोड पर्यंत पसरलेला आणि पश्चिमेकडे मालाड पश्चिम सुंदर नगर ते सांताक्रुज बस डेपोपर्यंत पसरलेला हा विस्तीर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ प्रामुख्याने अन्य मुंबई विभागाप्रमाणे वाहतूक कोंडीचा विभाग म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. १७.२५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये वाहतूक कोंडीची कारणे एक दोन नव्हे तर अनेक आहेत.
या मतदार संघातील नागरिक, प्रवासी – वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण, एक तास लागत असल्याने वाहनचालक – प्रवासी तर हैराण झाले आहेत.सकाळी आणि संध्याकाळी पश्चिम दुर्तगती महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी गुंदवली ते राष्ट्रीय उद्यान,ओव्हरीपाडा पर्यंत मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी टास्क फोर्स समिती गठीत करुन ठोस उपाययोजना जर केली नाही तर येथील वाहतूक कोंडी उग्र रूप धारण करेल अशी भिती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
पहिले म्हणजे महापालिकेची ऑक्टोबर ते जूनच्या दरम्यान चालू असलेली खोदकामे, हे आत्तातर नित्यनेमाचे झालेले आहे. एकतर पावसाळ्यात खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते. आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मे महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या कामाच्या निमित्ताने होणारी कोंडी ही तर सर्व सामान्यांना डोकेदुखीची झाली आहे.
सध्या तर रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे टेंडर एकदम काढल्यामुळे आणि एकाच कंपनीला काम दिल्यामुळे, एकाच वेळी काम सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड होते आणि याचा मनस्ताप या विभागातील नागरिकांना तसेच नोकरवर्गाला त्याचा मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्या महापालिकेत राज्य शासनाचा हस्तक्षेप असल्याने उद्धव माजी नगरसेवकांना खड्या सारखे बाजूला काढून टाकण्यात आले आहे, त्यामुळे महापालिकेवर वचक राहिला नाही, ज्यांना कामाची व त्यावरून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना नसलेल्यांच्या हातात चाव्या असल्याने बेधडक पणे रस्त्यांवरील चौकाच्या मध्यभागी, प्रत्येक वळणाच्या व गल्लीच्या तोंडावर खोदकाम सुरू असल्याने व सदरचे खोदकाम एक महिना तसेच रहात असल्याने वाहतुक समस्या गंभीर झाली आहे.
अंधेरी पश्चिम येथील जे. पी. रोड, दत्ताजी साळवी मार्ग हे तर वाहतुकीसाठी गंभीर रूप धारण करत आहेत. तसेच खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक बेपर्वाईने वाहन रस्त्याच्या कडेला, वळणाच्या कडेला उभे करतात ते ही वाहतूक कोंडी ला सहाय्यक ठरते. तसेच बेपर्वाईने उलट्या दिशेने येणारी दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने सुध्दा ब-याच वेळेस वाहतूक कोंडीला कारणीभूत असतात.- राजेश शेट्ये,उपविभागप्रमुख, उद्धव सेना
वाहतूक कोंडीची मुख्य कारणे-
जड वाहनांना सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत दिलेली धावण्याची परवानगी.मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहने चालवणे.रस्त्यांवर असलेले बेकायदेशीर पार्किंग.रिक्षा आणि ओला आणि उबेर कॅबना अमर्यादित परवानग्या देणे.-ॲड. गॉडफ्रे पिमेंटा विश्वस्त,वॉचडॉग फाउंडेशन