धरणक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच; सात धरणांमध्ये किती पावसाची नोंद? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:26 AM2024-06-21T08:26:37+5:302024-06-21T08:27:16+5:30

समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणातील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. 

The dam area is still waiting for rain | धरणक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच; सात धरणांमध्ये किती पावसाची नोंद? जाणून घ्या

धरणक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच; सात धरणांमध्ये किती पावसाची नोंद? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सातही धरणांमध्ये एकूण ५.३२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरण क्षेत्रात पावसाने ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. गुरुवारी पहाटेपर्यंत सातही धरणांमध्ये केवळ १६२ मिमी पावसाची नोंद झाली.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे, भिवंडी – निजामपूर महानगरपालिका आणि आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणातील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. 


मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ऊर्ध्व वैतरणामध्ये १० मिमी, मोडकसागरमध्ये २३ मिमी, तानसामध्ये ३८ मिमी, मध्य वैतरणामध्ये १८ मिमी, भातसामध्ये १० मिमी, विहारमध्ये १५ मिमी, तुळशीमध्ये ४९ मिमी पावसाची नोंद झाली. 

गेल्या वर्षी २० जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तानसा जलाशय वगळता इतर धरणांमध्ये पाऊस पडला नव्हता. तानसामध्ये केवळ १ मिमी पाऊस पडला होता. मात्र, सातही धरणांची पाणीपातळी यंदाच्या तुलनेत अधिक होती.  धरण क्षेत्रात चांगला पाऊस आवश्यक. सातही धरणांची मूळ पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ असून आता धरणांत केवळ ७७ हजार ०५२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक.

धरणातील राखीव साठ्याचा वापर
मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असली तरीही धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यातच सातत्याने खालावत चाललेल्या धरणातील पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनुसार, आता भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्याने मुंबईकरांची तहान भागविली 
जात आहे.

उदंचन यंत्रणा  पूर्ण क्षमतेने सुरू 
पालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी बिघाड झाला होता. मात्र आता  २० उदंचन पंप पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. मात्र अजूनही शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. लवकरच तो सुरळीत होईल अशी माहिती पालिकेने दिली.

Web Title: The dam area is still waiting for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.