Join us  

कोरोनाचा धोका अजून संपला नाही, सावधान! डॉ. संजय ओक यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:35 AM

कोरोनाचा धोका संपल्याचे अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही. त्यामुळे सावध, सजग व जागृत राहणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. संजय ओक यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: कोरोनाचा धोका संपला असल्याचे अद्यापही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही, त्यामुळे याबाबत सावध, सजग व जागृत राहणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्य कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले. कोविड विरोधातील लढा अतिशय अर्थवाही शब्दांत आणि समर्थपणे मांडणाऱ्या ‘मुंबई फाईट्स बॅक’ या पुस्तकाच्या निमित्ताने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित चर्चासत्रात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. भविष्यात वैद्यकीय सेवा सुविधांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक दिशादर्शक ठरणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित, पुस्तकाचे लेखक तसेच पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहलेखिका सुमित्रा देबरॉय उपस्थित होते. यावेळी डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, मुंबई महानगरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. मात्र, खासगी क्षेत्रातील वैद्यकीय यंत्रणेने सार्वजनिक क्षेत्रासोबत सुसमन्वय साधून केलेली बहुविध कामे यामुळे कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला आहे. पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याप्रसंगी आरोग्य वैद्यकीय सेवा सुविधांच्या अंमलबजावणीकरिता करण्यात आलेल्या प्रशासकीय सुव्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस