Join us

मेनहोलमध्ये पडून महिला बँकरचा मृत्यू! तासाभराने बाहेर काढला मृतदेह  

By गौरी टेंबकर | Published: January 05, 2023 9:53 AM

वांद्रे पूर्वच्या कलानगर येथे कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स आरडी क्रमांक ८ येथे हबटाउन सनस्टोन सोसायटीमध्ये श्रीवास्तवा त्यांच्या ९ वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. पती पासून विभक्त झालेल्या श्रीवास्तवा एका नामांकित बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या. 

मुंबई: वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील मलजल वाहिनीच्या उघड्या मेनहोलमध्ये पडून निपूर्णा श्रीवास्तवा (४१) या महिला बँकरला आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वांद्रे पूर्वच्या कलानगर येथे कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स आरडी क्रमांक ८ येथे हबटाउन सनस्टोन सोसायटीमध्ये श्रीवास्तवा त्यांच्या ९ वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. पती पासून विभक्त झालेल्या श्रीवास्तवा एका नामांकित बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास त्या सोसायटीतील मलजल वाहिनीच्या मेनहोलवर बसून फोनवर गप्पा मारत होत्या. त्यावेळी नकळत गटाराच्या तुटलेल्या झाकणावर त्यांनी हात ठेवला आणि तुटलेल्या लादीवरून त्यांचा तोल जाऊन त्या थेट १५ ते २० फुट खोल असलेल्या भूमिगत मलजल वहिनीत जाऊन पडल्या. 

हा प्रकार जवळच काम करणाऱ्या एका कामगाराने पाहिला आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळविले आणि अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करत त्यांचा शोध सुरू केला. तासाभराने त्यांना बाहेर काढत तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांमी त्यांना मृत घोषित केले. 

याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्यांचा मृतदेह शववच्छेदनासाठी कूपर रु्णालयात पाठविला आहे. तसेच, पोलिसांकडून घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज पडताळणी सुरू असून या अपघातामागे नेमका कोणाचा दोष आहे याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे सदर परिसरात खळबळ उडाली असून गटाराच्या तुटलेल्या झाकणाची तातडीने डागडुजी त्यानंतर करण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :मुंबई