मुंबई : पावसाळी अधिवेशनावेळी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना सुभाष यांनी साथ न दिल्याने त्यांचा सोमवारी अखेर मृत्यू झाला.
सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. २३ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना जखमी अवस्थेत जीटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर देशमुख यांच्यावर जे. जे. रुग्णालय येथे उपचार सुरू होते. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी देशमुख यांना मृत घोषित केले. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, देशमुख सीसीयू विभागात उपचार घेत होते, ते ४५ टक्के भाजले होते. त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन देशमुख यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.