मुंबई : पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र, आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल १९वर पोहोचला आहे.
अजय भोले पासपोर (२८), अजिंक्य गायकवाड(३४), कुशर प्रजापती(२०), सिकंदर राजभर(२१), अरविंद भारती(१९), अनुप राजभर(१८), अनिल यादव(२१), शाम प्रजापती(१८), रमेश बदिया(५०), प्रल्हाद गायकवाड (६५), गुड्डू पासपोर (२२) अशी मयतांची नावं आहेत आणि २ मृत लोकांची अजून ओळख पटली नाही. तर तीन जणांवर उपचार सुरु आहेत. नऊ जणांचा उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दुर्घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं पोहोचली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2.00 वाजता घटनास्थळाला भेट दिली होती. तर आता शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दुर्घटना स्थळी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एल विभाग' कार्यक्षेत्रातील कुर्ला परिसरात असणारी 'नाईक नगर सहकारी संस्था'ची इमारत' कोसळल्याची दुर्देवी घटना २७ जून २०२२ रोजी रात्री उशीरा घडली. या घटनेमध्ये 19 व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तिंपैकी 9 व्यक्तिंवर आवश्यक ते उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात तीन तर शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात एका जखमी व्यक्तिवर उपचार सुरु आहेत. तसेच या अनुषंगाने सदर इमारतीच्या परिसरात मदत व बचाव कार्य अव्याहतपणे सुरु आहे.