वेटींग तिकीट रद्द करणारा निर्णय अन्यायकारक; आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने वेधले रेल्वे प्रशासनाचे लक्ष
By सचिन लुंगसे | Published: July 1, 2024 06:43 PM2024-07-01T18:43:53+5:302024-07-01T18:45:03+5:30
अनेक रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे धावत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते असे नाही. पुढील प्रवासासाठी त्यांना रेल्वेच्या वेटींग तिकीटाचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो.
मुंबई : रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाही तर वेटींग तिकीटावर प्रवास करण्यास प्रशासनाने मनाई केल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या निर्णयावर नाराजी दर्शवली असून, वेटींग तिकीट रद्द करणारा निर्णय हा अन्यायकारक असल्याचे आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने म्हटले आहे.
अनेक रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे धावत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते असे नाही. पुढील प्रवासासाठी त्यांना रेल्वेच्या वेटींग तिकीटाचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो. मात्र रेल्वे प्रशासनाने तीही संधी हिरावून घेतल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा? असा सवाल आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने केला आहे.
मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासातील सुविधा काढून घेतल्या आहेत. काही मार्गावर रेल्वे अंतराचे निकष बदलून मेमू रेल्वे, पॅसेंजर व शटलही बंद केल्या आहेत. साधारण एका एक्सप्रेसमध्ये चारशेची वेटींग लिस्ट असते. त्यामध्ये एसएलचे एक तिकीट रद्द करण्यासाठी १२० रुपये, ए वनचे २४० रुपये, ए टू चे २०० रुपये, ए थ्री चे १८० रुपये तर सीसीचे १८० रुपये एवढे पैसे रेल्वे प्रशासन एक तिकीट रद्द करण्यासाठी आकारते.
उरलेले पैसे रेल्वे प्रवाशांना परत करते. म्हणजे रेल्वे प्रशासन फक्त तिकीट रद्द करण्यात प्रवाशांकडून लाखो कमवते. जे आम्ही रेल्वेला चार महिने अगोदर देतो. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याने रेल्वे प्रशासनाने मागे घ्यावा, असे आमची पश्चिम रेल्वे मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले. तर रेल्वे प्रशासनाने वेटींग तिकीट रद्द न करता त्याच मार्गावर नवीन रेल्वे सोडावी किंवा जादाचे कोच जोडावेत, याकडे लक्ष वेधले.