पोलीस पत्नीचा कुजलेला मृतदेह सापडला, वांद्रे परिसरातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:16 PM2022-09-20T13:16:39+5:302022-09-20T13:17:18+5:30
वांद्रे परिसरातील घटनेने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रेच्या निर्मलनगर परिसरात एका ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही महिला निवृत्त पोलीस निरीक्षकाची पत्नी असल्याची माहिती असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
निर्मलनगरच्या साई कृपा इमारतीमध्ये असलेल्या खोलीत वैशाली शेलार (वय ५८) या एकट्या राहत होत्या. त्यांचे पती विलास शेलार हे पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या खोलीतून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करत माहिती दिली. तेव्हा निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेलार यांच्या घराचा दरवाजा उघडला. तेव्हा आत शेलार यांचा मृतदेह त्यांना सापडला. तो त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शेलार या एकट्याच राहत असून त्या काही आजारांनी ग्रस्त होत्या. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार यात काही घातपात असल्याची शक्यता सध्या पोलिसांनी फेटाळून लावली असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे. आम्ही मृतदेह शविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवत त्याच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. याप्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाइकांना संपर्क करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.