मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आत असताना वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज दुपारी एच पूर्व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला चोप दिला. तत्पूर्वी माजी मंत्री -आमदार-विभागप्रमुख अनिल परब यांनी आक्रमक भाषण करून बाळासाहेबांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला आहे, त्यांनी परिणामाला तयार राहिले पाहिजे. उद्या पालिका अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना दाखवतो की कुठे कुठे अनधिकृत बांधकामे आहेत, कुठे कुठे अनधिकृत २-३-४ मजल्यांचे पक्षांचे ऑफीस आहेत, हिम्मत असेल तर ती तोडा, अन्यथा तुम्हालाच आम्ही तोडतो असा इशारा त्यांनी दिला.
वांद्र्याच्या अनधिकृत शाखेवर कारवाई होताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आत असताना तोडक कारवाई केल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाने मागणी केली. माजी मंत्री -आमदार-विभागप्रमुख अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आज सांताक्रूझ( पूर्व) येथील मुंबई महापालिकेच्या एच (पूर्व) वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन मागणी केली. येथील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मोर्चाला संबोधित करतांना अनिल परब म्हणाले की, पोलिसांच्या ताकदीवर आमच्याशी लढू नका, पोलिसांचे आमचे काही भांडण नाही.मात्र पोलिसांनी नि:पक्षपतीपणे काम करावे. कोणाच्या फालतू सांगण्यावरून तुम्ही आमच्या अंगावर येवू नका असा इशारा त्यांनी दिला.
येथील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर परत महिलांना जमायचे आहे. पाणी प्रश्न सुटला नाही तर महिलांनी आक्रमक राहिलंच पाहिजे. पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे आणि हा प्रश्न सुटे पर्यंत आंदोलन शांत होणार नाही, ते सुरूच राहिल असे त्यांनी ठणकावून सांगितले.
गटारे साफ झाली नाही,कचरा उचलला गेला नाही तर रोगराई पसरेल आणि नागरिकांना त्याचा त्रास होईल. सगळ्या गोष्टींची काळजी ही माझी आहे. त्यामुळे ही जबाबदारी माझी आहे. आज पासून या आंदोलनाला सुरवात झाली आहे असा इशारा त्यांनी दिला.