भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत काही कुस्तीपटूंनी त्यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व आंदोलकांना आंदोलन स्थळावरून हटवले होते. त्यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिथे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्यांना रोखले. दरम्यान, या आंदोलनाच्या झळा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत.
कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोँण सचिन तेंडुलकरच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. कुस्तीपटूंचं आंदोलन उधळवून लावण्याच्या पद्धतीवर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने आपलं मत मांडलं होतं. मात्र या वादावर सचिन तेंडुलकर याने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरवर टीका होत आहे.
यूथ काँग्रेसकडून बुधवारी सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर आंदोलन करून पोस्टर लावण्यात आले. कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकरने काहीच प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे, दरम्यान, काँग्रेसने सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर लावलेले पोस्टर्स तातडीने हटवले आहेत.