मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात ५० हजार रुग्णमित्र तयार करण्याच्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या महत्वपूर्ण रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थितीत दादर वसंत स्मृती येथे झाला. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींची उपस्थिती होती.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात रुग्णमित्र अभियान संयोजक डॉ.अजित गोपछडे व भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रभारी रामेश्वर नाईक, संयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे, सहसंयोजक डॉ. राहुल कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय आघाडीच्या विविध प्रकोष्टचे संयोजक व पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.
या अभियानात प्रत्येक गावात दोन रुग्णमित्र तयार केले जाणार आहेत. या रुग्णमित्रांकडून नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जाईल. रुग्णाला अँम्ब्युलन्स व सर्व मदत मिळवून देण्याबरोबरच, त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अद्ययावत व योग्य रुग्णालयाची व डॉक्टर्सची माहिती उपलब्ध होणार आहे.
रुग्ण मित्र अभियान महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी आपण व आपली टीम संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाऊन आरोग्य सेवक टीम प्रशिक्षित करून अहोरात्र परिश्रम करणार असल्याचे डॉ.अजित गोपछडे यांनी सांगितले.या अभियानात सहभागी होण्यासाठी ९६४९४८५२४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.