महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा विकास हीच गुरुपौर्णिमेची भेट! आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केली भावना
By संजय घावरे | Published: July 13, 2022 08:48 PM2022-07-13T20:48:04+5:302022-07-13T20:55:37+5:30
Bharat Gogawale : महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हीच या वर्षीच्या गुरुपौर्णिमेची खरी भेट असल्याचे प्रतिपादन आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले.
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय कोडे सुटले आहे. आता केवळ विकास करायचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हीच या वर्षीच्या गुरुपौर्णिमेची खरी भेट असल्याचे प्रतिपादन आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले. श्री संत मोरे माऊली स्मारक विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना गोगावले बोलत होते.
लोअर परेल येथील श्री संत मोरे माऊली स्मारक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सदगुरु हभप दादामहाराज मोरे माऊली यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातील गावे, वाड्या, पाडे यांचा जवळपास 75 टक्के विकास करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. उरलेली 25 टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प करतो. आमच्या खांद्यावर असलेला हिंदुत्वाचा झेंडा वारकऱ्यांच्याच खांद्यावरील आहे. पंढरपूर मध्ये विकासाची बरीच कामे वेगात पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही सुद्धा गोगावले यांनी दिली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत मंदिरात महाराष्ट्रातील नामवंत गायक, वादकांच्या सुरेल भजनाचा कार्यक्रम पार पडला. तदनंतर सदगुरु दादामहाराज मोरे माऊली यांचे करण्यात आले. त्यांनंतर सद्गुरूंनी प्रवचनाद्वारे साधकांना मार्गदर्शन केले.
देव ते संत देव ते संत... : दादामहाराज मोरे माऊली
कोरोना काळात जिवाभावाची माणसे डोळ्यासमोर गेली. जगात यापेक्षा भयाण अवस्था कोणतीही नसेल. देव, संत आणि गुरूंच्या कृपेमुळे आज आपण सर्व हयात आहोत. पंढरपूरमधील जनसमुदाय पहिल्यावर जीव आणि शिवाचे नाते अधोरेखित होत. संतांच्या उपासनेमुळे आपण आज सुखरूप आहोत. भारतातील संत आगळेवेगळे होते. महाराष्ट्रातील संतानी मराठीचा गौरव सात समुद्रापार पोहोचवला. संत भेटणं अवघड आहे, पण गुरूंच्या मनात आले तर ते लगेच भेटतात. असत्याकडून सत्याकडे आणि अंधारकडून प्रकाशाकडे नेतात ते गुरू.