Join us

दोनच वर्षांत मुंबईत एअर टॅक्सी झेपावणार? बंगळुरूत सेवा, ‘डीजीसीए’ची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 11:47 AM

महानगरांतील वाढत्या वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता देशात सुरू असलेली एअर टॅक्सीची चर्चा आता दृश्यरूपात येताना दिसत आहे.

मुंबई : महानगरांतील वाढत्या वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता देशात सुरू असलेली एअर टॅक्सीची चर्चा आता दृश्यरूपात येताना दिसत असून या टॅक्सीच्या चाचपणीसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पुढाकार घेत काही तांत्रिक समित्यांची स्थापना केल्याची माहिती आहे. या समित्यांकडून अहवाल प्राप्त होऊन त्या अनुषंगाने एअर टॅक्सीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करून २०२६ पर्यंत मुंबईसहदिल्ली व बंगळुरू येथे एअर टॅक्सी प्रत्यक्षात अवतरण्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, बंगळुरू येथे कोणत्या मार्गांवर एअर टॅक्सी सुरू करता येईल तसेच या टॅक्सीचे उड्डाण उभ्या दिशेने (व्हर्टिकल) होणार असल्यामुळे या शहरांतील कोणत्या जागांवर त्यांचा तळ सुरू करता येईल, आदी मुद्द्यांची चाचपणी करण्यासाठी तांत्रिक समित्या काम करणार आहेत.

अमेरिकेत प्रयोग...

अलीकडेच अमेरिकेतील एका कंपनीने तेथील शहरांत ही सेवा सुरू करण्यासाठी २०० एअर टॅक्सींची खरेदी केली आहे. अमेरिकेतील प्रयोगानंतर संबंधित कंपनी भारत आणि यूएई येथे ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे.

१) समितीचा अहवाल काही महिन्यांत प्राप्त होणार असून त्यानंतर सेवेसाठी निविदा जारी करण्यात येतील. 

२) २०२६ पर्यंत मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे ही सेवा सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चेन्नई, हैदराबाद येथे ही सेवा सुरू करण्यात येईल. 

टॅग्स :मुंबईटॅक्सीदिल्ली