संगीतातील ‘धा’ निघून गेला... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:26 AM2023-12-31T06:26:39+5:302023-12-31T06:27:39+5:30

"मी त्यांना शिवतांडव वाजवण्याची फर्माईश केली. रावणरचित शिव तांडव त्यांनी वाजवले. त्यापूर्वी मी शिव तांडव कधीच ऐकले नव्हते. त्या वादाने माझ्या मनावर अक्षरशः गारूड केले."

The Dha in music is gone says renu mujumdar | संगीतातील ‘धा’ निघून गेला... 

संगीतातील ‘धा’ निघून गेला... 

रोणू मुजुमदार, प्रसिद्ध बासरीवादक -

चिपळूणमध्ये रंगलेली ‘त्रिनाद’ ही भवानी शंकर यांची अखेरची संगीत मैफल ठरली. विद्याधर निमकर यांच्या आमंत्रणावरून २५ डिसेंबरला चतुरंगचा कार्यक्रम सादर करण्यासाठी भवानी यांच्यासोबत गेलो होतो. मी त्यांना भाईजी म्हणायचो. चतुरंगचा कार्यक्रम असल्याने ते एका पायावर तयार झाले. तिथे त्यांनी असे काही वाजवले की, ते शब्दांत वर्णन करू शकणार नाही. आम्ही जोडीने तिनताल वाजवला. मी त्यांना शिवतांडव वाजवण्याची फर्माईश केली. रावणरचित शिव तांडव त्यांनी वाजवले. त्यापूर्वी मी शिव तांडव कधीच ऐकले नव्हते. त्या वादाने माझ्या मनावर अक्षरशः गारूड केले.  

  भवानी शंकर यांना मी अनेकदा बासरीवादनाची साथ द्यायचो. कार्यक्रम संपवून आम्ही मुंबईत परतलो. पखवाज या वाद्याला भवानीजींनी जो सन्मान मिळवून दिला त्याची संपूर्ण जगात तोड नाही. 

त्यांच्या जाण्याने आज संगीतातील ‘धा’ निघून गेला. एका ‘धा’ने संपूर्ण सभागृह हलवून टाकायचे. त्यांनी फक्त ‘धा’ वाजवला तरी संपूर्ण सभागृह शांत व्हायचे. विजय घाटे आणि माझ्यासोबत त्यांनी शेकडो कार्यक्रम केले. देश-विदेशात कार्यक्रम केले. पखवाज या वाद्याला आकाशाच्या उंचीवर नेण्याचे काम पं. भवानी शंकर यांनी केले. त्यांच्याशी असलेल्या ऋणानबंधामुळे निधनाची बातमी ऐकताच मला अश्रू अनावर झाले.  

मागील ४० वर्षांपासून मी त्यांच्यासोबत साथसंगत केली आहे. १९८०मध्ये जेव्हा मी आर. डी. बर्मन म्हणजेच पंचमदा यांच्यासोबत वाजवू लागलो, तेव्हा तेही तिथे वाजवायचे. पखवाज आणि तबल्याची ते शान होते. ते माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे होते. 

चिपळूणमध्ये कार्यक्रम केल्यावर त्यांना थोडा श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता, पण इतक्या लवकर पखवाज पोरका करून ते जातील, असा कधीच विचार केला नव्हता. ‘जय श्री राम’ म्हणूनच ते पखवाज वाजवायला सुरुवात करायचे. साक्षात भवानीमातेचा त्यांना आशीर्वाद होता म्हणूनच त्यांचे नाव भवानी होते. त्यांच्यासारखे भवानी दुसरे होऊ शकणार नाहीत. त्यांनी पुढील पिढी घडवण्याचे कामही केले, जे पुढे त्यांचा वारसा सुरू ठेवतील. कुणाल पाटील, पंचम वर्मा त्यांचे शिष्य आहेत. ते शिष्यांकडून काहीही घेत नसत. सेवा केली, त्यातही वादनाची सेवा असेल तर ते खूश व्हायचे.

Web Title: The Dha in music is gone says renu mujumdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.